पुणे: भूमी अभिलेख विभागातील ११२० भूकरमापक (सर्वेअर) पदाच्या परीक्षेसाठी तब्बल ७६ हजार ३७९ अर्ज आले आहेत. अर्जाच्या छाननीसह सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ४५ हजार ६८८ उमेदवार परीक्षेस पात्र ठरले आहेत.
भूकरमापकाची पदे भरण्यासाठी गेल्या वर्षी राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानुसार सहा विभागांत ११२० पदे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर अखेर २८, २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात परीक्षा होणार आहे. या परीक्षेस जे उमेदवार छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण न केल्याने अपात्र ठरले होते, अशा २६ हजार ८८० विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यानुसार २० नोव्हेंबरपर्यत सर्व बाबींसह विभागाकडे मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
असे करा परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड: परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in वर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवाराने संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्यावरील नमूद परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे.
परीक्षेचे वेळापत्रक:
२८ नोव्हेंबर: पुणे विभाग– पहिले सत्र, कोकण विभाग दुसरे सत्र
२९ नोव्हेंबर: नाशिक, अमरावती पहिले सत्र, औरंगाबाद विभाग दुसरे सत्र
३० नोव्हेंबर: नागपूर विभाग पहिले सत्र.