अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का? असा प्रश्न प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या उदघाटनीय कार्यक्रमात उपस्थित केला. या वेळी व्यासपीठावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते.
अंबाजोगाई येथे गेली ३८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या विस्तारीत भाषणात विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनीय भाषणाची सुरुवात करतांना विश्वास पाटील यांनी या समारंभाचे कौतुक करीत असा समारोह पश्चिम महाराष्ट्रात कोठेही होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांच्या चिमणीतून मोठा धूर निघतो मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागवण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात होत नाहीत याची खंत व्यक्त केली.
आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करीत असतांना अनेक निर्णयांची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय राज्यातील सामान्य माणसांना न्याय देणारे घेतले. १९७६ साली धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा यशवंतराव चव्हाण यांनी अंमलात आणला आज या कायद्याची संपूर्ण भारतात अंमलबजावणी होत आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का? असा प्रश्न अलिकडे आपल्याला पडत आहे. ज्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी यशवंतराव चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्याच सामान्य लोकांना आज आपल्या न्याय हक्कासाठी भांडावे लागत आहे. आज विद्यार्थी संख्या च्या आधारावर शाळा बंद करण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. २० विद्यार्थी संख्या असेल तर शाळा चालू अन्यथा बंद करण्याचा निर्णय चुकीचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात समारोह स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी मागील ३७ वर्षे घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमातून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर सुरू असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या योगदानाचा जागर करण्यासाठी हा समारोह आयोजित करण्यात येतो असे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, संगीत, सांस्कृती आणि राजकारण या क्षेत्रात घालून दिलेला मापदंड आज ही कायम आदर्शवादी आहे. त्यांच्या विचारांचा हा जागर कायम ठेवण्यासाठी हा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह साजरा करण्यात येतो.
या ३८ व्या समारोहाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचा आपल्या मनस्वी आनंद होतो आहे. विश्वास पाटील यांच्या सारखा सिद्धहस्त लेखकाच्या आणि एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या हस्ते हे उद्घाटन होणे ही आनंदाची बाब असल्याचे दगडू लोमटे यांनी सांगितले. यावेळी विश्वास पाटील यांचा परिचय अमृत महाजन यांनी करुन दिला.