जालन्यात पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांसह, दोन तरूणी, दलालास पकडले
जालना: पतीपासून विभक्त झालेल्या आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या तरुणींना हेरून वेश्या व्यवसायात आणून कुंटनखाना चालविणाऱ्या जालन्यातील कुख्यात मुख्य सुत्रधारास बेड्या ठोकण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. शहरातील नूतन वसाहत भागातील विद्युत कॉलनीत शुक्रवारी पोलिसांनी या कुंटनखान्यावर धाड टाकून मुख्यसूत्रधार संतोष उढाण याच्यासह ऑंटीची भूमिका निभावणाऱ्या त्याची पत्नी, आई, एक दलाल यांना ताब्यात घेऊन, वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या कुंटणखाण्यावरून रोख रक्कम, दोन महागडे मोबाईल, एक दुचाकी व अन्य मुद्देमाल असा एकूण एक लाख 41 हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.
जालना शहरातील शिवनगर परिसरात संतोष गोविंदराव उढाण हा व्यक्ती गेल्या काही दिवसापासून कुंटणखाना चालवत होता. या कुंटणखाण्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत असल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून आवाज उठविला होता. त्यानंतर उढाण याने हा कुंटणखाना शहरातील नूतन वसाहतलगत असलेल्या विद्युत कॉलनीत हलविला होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. शुक्रवारी सांयकाळी पोलीस उपअधीक्षक राजगुरू यांनी या कुंटनखान्यावर एक डमी ग्राहक पाठवून मोठ्या लवाजम्यासह धाड टाकली. यावेळी दोन 25 वर्षीय तरुणीकडून वेश्या व्यवसाय करून घेतांना आढळून आले. यातील एक तरुणी पुणे येथील तर दुसरी अंबड येथील असून, त्यांना शहरात ग्राहकासोबतही बाहेर पाठविण्यात येत होते. या दोन्ही तरुणींकडून उढाण हा गेल्या तीन वर्षांपासून वेश्या व्यवसाय करून घेत होता.
या वेश्या व्यवसायात ग्राहकांकडून पैसे जमा करण्याचा व्यवहार उढाण याची 36 वर्षीय पत्नी आणि 55 वर्षीय आई, या दोघी सांभाळून ऑंटीची भूमिका निभावत होत्या. संतोष उढाण याने या कुंटणखाण्यासाठी भागचंद रामजी मिमरोट (वय 45, रा. चंदनझिरा) या दलालाची खास नेमणूक केली होती. मिमरोट हा ॲक्टिव्हा दुचाकीवरून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणी आणि ग्राहकांना आणून-नेऊन सोडण्याचे काम करीत होता. यावेळी पोलिसांनी मुख्यसूत्रधार संतोष उढाण, त्याची पत्नी, आई, दलाल भागचंद मिमरोट या चौघांसह वेश्या व्यवसायासाठी बोलावलेल्या दोन तरुणी अशा 6 जणांना ताब्यात घेतले. यावेळी शरीरविक्रीचा व्यवसायातून आलेले रोख 41 हजार 120 रुपये, 20 हजाराचे दोन मोबाईल, 80 हजाराची ॲक्टिव्हा, असा एकूण 1 लाख 41 हजार 120 रुपयांच्या मुद्देमालासह कंडोमचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणात पिंक मोबाईलच्या सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात मुख्यसूत्रधार संतोष उढाण, त्याची पत्नी, आई आणि दलाल भागचंद मिमरोट या चौघाजनांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक, सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार दादासाहेब चव्हाण, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, बाबा गायकवाड, किरण चेके, महिला अंमलदार वैशाली जावळे, रूपाली फुके, मनीषा नागलोत,स्वाती भातसोडे आदी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.