अंबाजोगाई: आज समाजमाध्यमांचे रूप पाहिले तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला चिंता वाटते की, आज समाजमाध्यमांचा जो भडीमार होत आहे. त्यातून काय घ्यावे आणि काय समाजाला द्यावे. परंतु, वृत्तपत्रांनी गेल्या शंभर वर्षांत जे योगदान पत्रकारितेसाठी दिले आहे. त्याचा विचार केला तर समाज माध्यमातील अपप्रवृत्तीमुळे तसेच आक्रस्ताळेपणा आणि अक्रमकपणा वाढल्यामुळे पत्रकारिता धोक्यात येत असल्याचे मत एनएसडीचे माजी संचालक तथा पद्मश्री वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई शहरात गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये वेगळी छाप पाडणा-या दैनिक वार्ता समूहाचा 15 वा वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स को.ऑप बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या निवेदिका निकिता पाटील, चला हवा येवू द्या फेम सोनाली भगरे, केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, परभणी येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, अॅम्पा संघटनेचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, एसएनएस पतसंस्थेचे चेअरमन नाथ रेड्डी, मधुमेह तज्ज्ञ डॉ.अतुल शिंदे, उद्योजक प्रतापराव पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आपेगावचे सचिव जयजीत शिंदे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे प्रतिनिधी विकासराव मुंडे, पानगावकर काका, प्रदिप पतकराव उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि गुणीजणांचा सन्मान करण्यात आला. नगरभूषण पुरस्कार लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सद्भावना पुरस्कार जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम (धायगुडा पिंपळा) यांच्या वतीने पानगावकर काका, सर्जेराव सावरे तर युवा गौरव पुरस्कार प्रदिप पतकराव यांना वितरीत करण्यात आला. तर गौरव गुणीजणांचा या उपक्रमांत रवींद्र (राजा) ठाकूर, डॉ.स्नेहलताई होळंबे, डॉ.सचिन पोतदार, अनंतदादा लोमटे, सुरेशराव कराड, संजय गंभीरे, भरतराव पतंगे, पत्रकार शुभम खाडे, कॅप्टन सुमित हरंगुळे यांच्या वतीने वडील शिवानंद हरंगुळे, युवा संगीतकार ओंकार रापतवार, बालशाहिर अविष्कार एडके, स्वप्नील नरूटे, आर्किटेक्ट आकाश कराड, कु.प्रतिक्षा दत्तात्रय अंबेकर, कु.रिद्धीमा सांगळे, मुडेश्वर महिला बचतगट (मुडेगाव), बाळूमामा पुुरूष बचतगट (पूस), आदींसह इतरांना यावेळी त्यांच्या क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले.
वामन केेंद्रे म्हणाले की, भारतात व जगात वृत्तपत्राला खूप मोठी परंपरा आहे. वर्तमानपत्रामुळे क्रांतीची व परिवर्तनाची बिजे रोवली गेली. वृत्तपत्रांमुळे त्या काळात जनजागृती आणि प्रबोधन करण्याचे काम केले. आज हिच वृत्तपत्र चळवळ व इलेक्ट्रॉनिक मिडिया हा भांडवलदाराच्या ताब्यात गेल्याने देशाचे व जगाचे वास्तव चित्र समोर येत नाही. केवळ समाज माध्यमातून आक्रस्ताळेपणा व आक्रमकपणा हा प्रेक्षकांच्या माथी मारला जात आहे. यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. याचे चिंतन होण्याची गरज आहे. माध्यमांवर खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी कुठेतरी झटकल्याचे चित्र दिसत आहे. कारण वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हा कोणाचा तरी कळसुत्री बाहुला बनला आहे. त्यामुळे समाजाने सुद्धा प्रत्येक बातमीची दखल घेत असताना त्याची सत्यता व वास्तविकता पडताळण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात आजही वृत्तपत्राचे अस्तित्व आणि विश्वास टिकून आहे. कारण, दैनिक वार्ता सारखी वृत्तपत्रे ही समाजाचा अभ्यास करुन समाजाला अभिप्रेत असलेली पत्रकारिता निभावत आहेत. आणि ज्या परिस्थिती मधून संपादक परमेश्वर गित्ते आलेले आहेत. त्यांना सामाजिक भान आणि जाण असल्याने त्यांच्यावर सध्या तरी भांडवलदारांनी काबीज केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून निःस्पृह पत्रकारिता केली जात असल्याचे दिसत आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकातील कर्तृृत्वसंपन्न आणि कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करून या वृत्तपत्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा वृत्तपत्रांमुळे सामान्य जणांमध्ये विश्वासाचे बिजारोपण होत असल्याचे दिसत आहे.
यावेळी टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या निवेदिका निकिता पाटील म्हणाल्या की, वृत्तपत्र चळवळीला बळकटी देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच वृत्तपत्राचे वैभव आणि अस्तित्व टिकून राहिल.
सिनेअभिनेत्री सोनाली भगरे म्हणाल्या ज्या मातृभूमीत माझे शिक्षण झाले. माझ्यावर संस्कार झाले आणि जिथून सांस्कृतिक पायाभरणी झाली त्याच मातृभूमीत माझा वार्ता समूहाच्या वतीने सन्मान होतो आहे. ही माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियांसाठी खूप मोठी बाब आहे. म्हणून हा सन्मान माझ्या जीवनातील सर्वोच्च असणार असल्याचे मत भगरे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप राजकिशोर मोदी यांनी केला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले.