*देशातील १२ राज्यांच्या मंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती*
पुणे: राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरीता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याचबरोबर त्या योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पाहोचविण्यासाठी पुण्यात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे २८ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील हॉटेल दी रिट्झ कार्लट्न येरवडा येथे होणाऱ्या या क्षेत्रीय कार्यशाळेत राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्यासह पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दीव दमन, दादरा नगर हवेली व गोवा अशा १२ राज्यांचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेत विविध राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या घटकांतील लोकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी व इतर राज्यांमध्ये नव्याने लागू करण्यात येणाऱ्या योजना व त्या संदर्भातील धोरणांची आखणी, नियम व कायदे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध राज्यांच्या व केंद्र शासनाच्या योजना पाहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा/ विचारमंथन करुन मसुदा तयार करण्यात येणार आहे.
ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी व देशातील विविध राज्यातील योजनांमध्ये राज्याच्या योजना प्रतिबिंबित व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करत आहे. शासनाने याकामी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
देशपातळीवरील कार्यशाळेबाबतचा समाज कल्याण आयुक्तांकडुन आढावा
२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या या कार्यशाळेसाठी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.नारनवरे यांनी कार्यशाळेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत केल्या आहेत. या सर्व समिती प्रमुखांकडून त्यांनी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
कार्यशाळेच्या प्रथम दिवशी २८ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय), जेष्ठ नागरिक व पालक कल्याण कायदा व अटल वयो अभ्युदय योजना, तृतीयपंथी यांच्या कल्याणाच्या योजना, हाताने मैला साफ करणारे कामगार, भारत सरकार शिष्यवृती योजना (प्री मॅट्रीक व पोस्ट मॅट्रिक), व्यसनमुक्ती व नशामुक्ती भारत अभियान या विषयाना प्राधान्य देण्यात आले आहे. या विषयावरील चर्चेत उपस्थित मान्यवर सहभागी होणार असून त्या-त्या राज्याचे प्रतिनिधी सादरीकरण करणार आहेत.