पुणे: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार, २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज मतमोजणी केंद्राची पाहणी केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे,निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, निवडणूक सहाय्यक प्रशांत शिंपी, ईव्हीएम कक्षाचे समन्वयक बापूसाहेब गायकवाड, टपाली मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, डॅशबोर्डच्या समन्वयक अनिता कोटलवार आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख यांनी या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रीया नियोजनबद्धरितीने पार पाडण्याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. मतमोजणीच्यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करावे असे त्यांनी सांगितले.
*मतमोजणीच्या ३७ फेऱ्या*:
मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती श्री. ढोले यांनी दिली आहे. त्यांनी इटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची चाचणीसह डॉ.देशमुख यांना माहिती दिली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आणि पोलीस अधिकारी यांनी मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
*कसबा पेठ विधानसभेची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळ गोदामात*:
कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळ गोदाम येथे कसबापेठ विधानसभा मतदार संघ मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते, परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ- बारटक्के आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. देशमुख यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मतमोजणीसाठी करण्यात आलेली टेबलची व्यवस्था, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी यांची व्यवस्था, तेथील सुरक्षा व्यवस्था, मतमोजणीच्या ठिकाणी नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठीची व्यवस्था आदीसंबंधाने माहिती घेऊन त्यांनी सूचना केल्या.