श्रीहरीकोटा: भारताचे चांद्रयान-३ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी २:३५ वाजता यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. काउंट डाऊन संपताच ज्वाळांचे लोट उडवत इस्रोच्या एलव्हीएम-३ मधून चांद्रयान-३ वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. रॉकेटच्या आवाजात टाळ्यासह, भारत माता की जय च्या घोषणाही निनादल्या. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.
चांद्रयान-३ शुक्रवारी दुपारी २:३५ वा. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान-३ लाँच केले. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी विविध शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थी अंतराळ केंद्रात पोहोचले होते. यावेळी अंतराळ केंद्रावर हजारो लोक उपस्थित होते.