‘ती पोकळी भरून काढण्यासाठी पुन्हा एक महानोर जन्माला यावे लागेल’

पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या निधनाची बातमी कळली आणि गेली कित्येक वर्ष त्यांचा असलेला ऋणानुबंध डोळ्यासमोर उभा राहिला. मराठी कवितेला विशेषतः ग्रामीण, शेतीभाताच्या, रानाफुलांच्या कविता व इतर लेखन लोकप्रिय  झाले त्यात  महानोर यांचा मोठा वाटा आणि सहभागही आहे तो कायम राहील. 

अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात कवी म्हणून अनेकदा व उद्घाटक म्हणून ते आले. माझे चुलते स्व. भगवानराव लोमटे बापू हे महानोर यांच्या कवितेचे आस्वादक होते. त्यांना महानोर यांच्या कविता तोंडपाठ होत्या. त्यामुळे बापूंचे आणि महानोर यांचे घनिष्ठ संबंध होते. मी साहित्य चळवळीत सक्रिय झालो आणि महानोर यांना भेटण्याचा, कविता, भाषणे ऐकण्याचा अनेकदा प्रसंग आला. अंबाजोगाई मला खूप आवडते असे नेहमी म्हणायचे. म्हणून३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाईत पार पडले त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ठरले होते. ते अंबाजोगाईत आले पण. इथे पोहंचले आणि त्यांच्या बंधूंच्या निधनाची बातमी आली आणि त्यांना परत जावे लागले.

मराठवाडा साहित्य परिषदेचे ते आधारस्तंभ होते. मागच्या परिषदेच्या  निवडणुकीत ठाले पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकारी मंडळ निवडून आल्यावर जालना येथे सर्वांचा सत्कार करण्यात आला. माझ्या सत्काराच्या वेळी त्यांनी आवर्जून विचारपूस केली. त्यानंतर  बापूंचे निधन झाले आणि त्यांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार आम्ही चालू केला. दुसऱ्याच पुरस्कार त्यांना डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते दिला. पटेल आणि महानोर ही जोडी प्रसिद्ध होती त्यामुळे सभागृह खच्चाखच  भरलेलं होते. त्यावेळी दोघांच्या भाषणांची जुगलबंदी आजही आठवते. अनेक आठवणी, चित्रपट, राजकारण, शेती, साहित्य यावर सखोल अभ्यास असलेल्या महानोरांचे भाषण चिरकाल अंबाजोगाईकर यांच्या लक्षात राहील. त्यांची माझी शेवटची भेट मार्च महिन्यात नांदेड येथे शंकर दरबार साहित्य संमेलनात झाली. त्यांना शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार देण्यात आली. रात्रीच्या कविंसमेलनात माझे कविता वाचन होते. तेंव्हा आवर्जून माझे “राहून गेलेले पत्रे” हे पुस्तक भेट दिले. त्यांनी पुस्तक चाळून कौतुक केलं. जवळ घेवून यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह सातत्याने करता म्हणून जाहीर कौतुक केलं. 

अलीकडे त्यांच्या पत्नी सुलोचना यांचे निधन झाले. ते एकाकी झाले. तेंव्हा पासून त्यांची तब्येत बरी नव्हती. तरी ते जमेल तसे फिरत राहिले. नांदेडहून परत गेल्यावर मला फोन केला आणि कांहीं पुस्तके तुला पाठवत आहे वाच.  जून महिन्यात मला रजिस्टर पोष्टने  पुस्तके मिळाली. त्यात त्यांच्या पत्नी सुलोचना यांच्या स्मृतींना उजाळा देणारे “सुलोचनेच्या पाऊलखुणा” हे पुस्तकही होते. वाचून त्यांना कळविले. इतक्या मोठ्या माणसांने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची आठवण ठेवून काळजी घेणे हा मोठेपणा त्यांनी जपला. 

विलक्षण बुद्धिमत्ता, शेती विषयी निष्ठा आणि  शेतिभातावर, रानफुला बरोबर माणसांच्या सुखदुःखाचे साहित्य त्यांनी लिहिले आणि त्यातील प्रश्नांना वाचा फोडली. त्यांची अनेक चित्रपट गीते लोकाभिमुख आहेत. ती कायम अजरामर आहेत. त्यांचे निधन केवळ मृत्यू नाही त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण नक्कीच होणार आहे. ती भरून काढण्यासाठी पुन्हा एक महानोर जन्माला यावे लागेल. भावपूर्ण श्रद्धांजली..!

-दगडू लोमटे

9823009512

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *