जालन्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

जालना: राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यात पत्रकार संरक्षण कायदा सपशेल अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज गुरुवारी (ता. 17) जालन्याच्या महात्मा गांधी चौकात जोरदार निदर्शने करीत, पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पत्रकारांनी कुचराई करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, पत्रकारांवर यापुढे हल्ले झाल्यास, ते कदापीही खपवून घेतले जाणार नाहीत, हल्लेखोराविरुद्ध आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी एकजुटीने तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा पत्रकार नेते अब्दुल हाफिज यांनी यावेळी दिला आहे.

राज्यात चार वर्षांपूर्वी पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. मात्र, या कायद्याची पोलीस यंत्रणेकडून कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे राज्यात कायदा झाल्यापासून 200 पेक्षा जास्त पत्रकारांवर भ्याड हल्ले झाले असून, या हल्ल्यात काही पत्रकार बांधवांचा जीवही गेला आहे. राज्यात केवळ 37 प्रकरणात या कायद्यानुसार गुन्हे दाखल झालेले असून, आतापर्यंत एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, त्यामुळे हल्लेखोरांचे मनोबल वाढत चालले आहे. याच्या निषेधार्थ अ. भा. मराठी पत्रकार परिषदेने आज राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात जोरदार निदर्शने करीत पत्रकार सरंक्षण कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी कायद्याच्या कठोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. पत्रकारावर हल्ला करणारे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला आहे.

यावेळी बोलतांना जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक अब्दुल हाफिज म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यामुळे पत्रकारांवरील हल्ले थांबतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कायदा झाल्यापासून त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले आहेत. गुन्हा घडल्यानंतर या कायद्यानुसार कारवाई न करता पोलीस यंत्रणा किरकोळ स्वरूपाची कलमे लावून, हल्लेखोरांना अभय देत आहेत. यापुढील काळात या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पत्रकारांना सोबत घेऊन, एकजुटीने लढा उभारल्या जाईल, असा ईशारा यावेळी अब्दुल हाफिज यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख यांनी पाचोरा येथे पत्रकारावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत, आमदार पाटील आणि त्यांच्या गुंडावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे, सुरेश केसापूरकर, विनायक दहातोंडे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष किशोर आगळे, नारायण माने, अभयकुमार यादव, धनसिंह सूर्यवंशी, शेख मुसा, गणेश औटी, धनंजय देशमुख, नूर अहमद, कृष्णा पठाडे, दिलीप पोहनेरकर, अंकुश गायकवाड, सुबोधकुमार जाधव, सीताराम तुपे, जावेद तांबोली, नाजीम मणियार, आशिष रसाळ, गंगाराम आढाव, सुनील खरात, रामभाऊ भालेराव, शांतीलाल बंसवाल, आमेर खान, किरण खानापुरे, नरेश श्रीपत, प्रदीप मुरमे, अक्षय शिंदे, गोकुळ स्वामी, शेख इब्राहिम, विलास गायकवाड, मोहन मुळे, संतोष सारडा, सर्जेराव गिऱ्हे, राजकुमार भारूका, अशोक शहा, अनिल व्यवहारे, मधू दंडारे, आदींसह शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *