आगळावेगळा सोहळा; अंबाजोगाईत रमलेल्या नेपाळी वॉचमनचा स्नेहसंवर्धन पुरस्काराने गौरव

अंबाजोगाई: नरपती कुंजेडा हे रात्र प्रहरी (नाईट वॉचमन). नेपाळहून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेले. जवळपास न शिकलेला हा माणूस. याने आपल्या मुलीला पदवीधर केले. मुलगा इंजिनियर केला. 15 ऑगस्ट 23 रोजी आंतरभारती, आंबाजोगाईच्या वतीने त्यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

अन्य प्रांतातून येऊन अंबाजोगाई येथे स्थायिक झालेल्या व अंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी 15 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो. यंदा दहावा पुरस्कार होता. अजितकुमार कुरूप (केरळ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरपती कुंजडा यांच्या पत्नी चंद्रकलाताई यांचा सत्कार मनीषा आर्य यांनी केला. हैदराबादच्या मनीषा राणी आर्य  व  आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. पूर्व सत्कारमूर्ती शशिकांत रुपडा (गुजरात), आनंद अंकम (तेलंगणा), राजू जांगीड (राजस्थान) मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले. अनिता कांबळे यांनी परिचय करून दिला. डॉ. पद्माकर घोरपडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. महावीर भागरे (संयोजक) यांनी आभार मानले. सहसंयोजक शरद लंगे यांनी प्रास्ताविक भाषण केले. शाखा अध्यक्ष दत्ता वालेकर अध्यक्षस्थानी होते, सचिव वैजनाथ शेंगुळे, अनिकेत डिघोळकर आदींनी कार्यक्रमाची तयारी केली. आंबाजोगाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गांधी विसरून चालणार नाही – अमर हबीब: महात्मा फुले यांनी एकमय लोक झाल्याशिवाय देश निर्माण होणार नाही असे म्हटले होते. म.गांधी यांनी विखुरलेल्या भारतीयाना देश म्हणून एकत्र आणले होते. म. गांधीला सोडून या देशाची कल्पना देखील करता येणार नाही. गांधी पुसून टाकण्याचे प्रयत्न देशाला महाग पडतील असे मत आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी या प्रसंगी व्यक्त केले. ‘हम सब एक हैं’ ही भावना दृढ करण्यासाठी स्नेहसंवर्धन पुरस्कार दिला जातो असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा सन्मान: म. गांधी प्रश्नावली परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या गावातील 9 वीच्या निवडक विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत ऋषिकेश मुंडे (मराठी), संपदा वाघ (इंग्रजी) व फुरखान सादेख अली (उर्दू) सर्वप्रथम निवडले गेले. 14 मराठी, 8 इंग्रजी व 6 उर्दू माध्यमाच्या शाळांनी यात भाग घेतला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *