मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा
अंबाजोगाई: अंबाजोगाई शहर हे “पुस्तकाचे गाव” म्हणून आज उच्च तंत्र शिक्षण, उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घोषित केले. राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे अंबाजोगाई हे राज्यातील “पाचवे” पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१७ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून “पुस्तकाचे गाव” (Book Village) हा उपक्रम सुरू करण्यात आला. या संकल्पनेतून ४ मे २०१७ मध्ये सातारा जिल्ह्यातील “भिलार” हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आणि याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका वाचनालयाची सुरुवात भिलार या गावात करण्यात आली.
या भिलार गावातील प्रत्येक घरात एक छोटी लायब्ररी आहे. जिथे विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. येथे प्रत्येक घरात प्रवेश खुले आहेत. त्यामुळे नागरीक आणि पर्यटक या घरांमध्ये जावून पुस्तके वाचू शकतात. या गावात २५ घरांमध्ये १५,००० हुन अधिक पुस्तकांसह तेव्हा हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.
राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने “पुस्तकाचे गाव” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा टप्प्या-टप्प्याने विस्तार करण्यात येत असून नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, असे शासनाचे निर्देश आहेत.
या योजने अंतर्गत आजपर्यंत भिलार या गावासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) येथे “पुस्तकांचे गाव” योजनेचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या नंतर आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अंबाजोगाई शहराचा “पुस्तकाचे गाव” या योजनेत समावेश केल्याची घोषणा केली आहे.
“पुस्तकाचे गाव” म्हणून घोषित करण्यात आलेल्या या गावांमध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करण्यात यावीत. या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. तसेच त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध असावीत, शिवाय येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा मंत्री यांनी केली आहे. या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेस दिले.
राजकिशोर मोदी यांच्या पाठपुराव्याला यश

अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी २०२४ मध्ये शहराचा समावेश “पुस्तकाचे गाव” या योजनेत करण्यात यावा अशी मागणी तत्कालीन शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. यानंतर त्यांनी सातत्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. आज राज्याचे उच्च शिक्षण, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बीड जिल्ह्यास भेट दिली असता एका शासकीय कार्यक्रमात ही घोषणा केली.
पुरातन काळापासून साहित्याचा वारसा
अंबाजोगाई शहरात पुरातन काळापासून साहित्याचा निवास आहे. मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज स्वामी, पासोडीकार संत दासोपंत यांच्या पासून सुरु झालेली साहित्य सेवा आज ही अव्याहतपणे सुरूच आहे. त्यामुळे या शहराचा “पुस्तकाचं गाव” या योजनेत कलेला समावेश हा शहरातील साहित्य सेवेचा गौरवच आहे.