औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील गुरूदत्तनगर येथील 47 वर्षीय रुग्णास 27 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी 6.20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोवीड रुग्णालयात 11 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज सायंकाळी सात वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 32 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. म्हणून आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 209 झाली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.
नवीन कोरोनाबाधित रूग्णांमध्ये (कंसात रुग्ण संख्या) संजय नगर, मुकुंदवाडी (16), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (2), नूर कॉलनी (2), वडगाव (1), असेफिया कॉलनी (3), भडकल गेट (1), गुलाबवाडी (2), महेमुदपुरा (1), सिटी चौक (1), जय भीम नगर (2) टाऊन हॉल (1) या परिसराचा समावेश आहे.
व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोरोना आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोवीड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोवीड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज दुपारी चार वाजेपर्यंत 46 रुग्णांची तपासणी करण्यात आली. घाटीत सध्या 47 रूग्ण भरती आहेत. सहा कोवीड निगेटिव्ह बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.