नांदेड: कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील नगिनाघाट गुरुद्वारा परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे उपस्थित असून, नगिनाघाट परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नगिनाघाट गुरूद्वारा क्षेत्र परिसरात २० कोरोना रूग्णा आढळून आल्यामुळे नगिनाघाट गुरूद्वारा, गुरूद्वारा लंगरसाहिब परिसर, गुरूद्वारा संचखंड गेट क्रमांक १ ते देना बँक, तसेच गेट क्रमांत २ ते ६ परिसर, चिखलवाडी, कनकय्या कंपाऊंड, बडपुरा, शहीदपुरा, रामकृष्ण टॉकिज हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे तो संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. मात्र, तेथील लोकांना जीवनाश्यक सेवा महापालिकेतर्फे घरपोच देण्यात येणार आहेत. त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहायक अधिकारी म्हणून प्रकाश गच्चे यांच्यासह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.