औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आज गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान सकाळी 8.05 वाजता कोरोना, न्यूमोनिआ, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकाराने मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांच्या लाळेचा नमुना घेतला तो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डेडिकेटेड कोवीड रुग्णालयात सध्या 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 20 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. कालपर्यंत घाटी रुग्णालयात केवळ अकरा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र, एका खासगी रूग्णालयातून सहा, दुसर्या रुग्णालयातून तीन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथून एका रुग्णांना घाटीमध्ये संदर्भीत केलेले आहे. घाटीत आज दुपारी चार वाजेपर्यंत 185 रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 18 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्यातील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले असून सात रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. एकूण 64 रुग्ण भरती असून 35 कोरोना निगेटिव्ह रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. एकूण नऊ कोरोना निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिली असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात 244 कोरोना रुग्ण:
औरंगाबाद शहरातील (कंसात रुग्ण संख्या) नूर कॉलनी (5), कैलाश नगर (3), बायजीपुरा (11), समता नगर (2), जयभीम नगर (1), किल्ले अर्क (2), टाऊन हॉल (2), गौतम बुद्ध नगर (1), संजय नगर (1) परिसरातील 28 कोरोनाबाधितांची आज भर पडली. यामध्ये 17 पुरूष आणि 11 महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 244 कोरोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील 244 रुग्णांवरील उपचारापैकी आतापर्यंत 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर एकूण 211 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात एकूण आठ रूग्ण व उर्वरित रुग्णांवर मनपाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचाराची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात 1 मे रोजी रात्री उशिरा सात रुग्ण वाढल्याने 1 मेपर्यंत 216 कोरोनाबाधित रूग्ण आढळलेले होते. मिनी घाटीत आज 40 जणांचे स्वॅब घेण्यात आले. 80 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचे अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.