पुणे: देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्यनेमाने आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना यौद्धा आहेत. दरम्यान, त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना यौद्धांचा सन्मान केला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय सैन्य दलाच्या विशेष विमानाने पुष्पवृष्टी केली.
पुण्यातही कोरोनावर उपचार करणार्या रुग्णालयावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे मेजर जनरल नवनीत कुमार यांनी व्यक्त केले. तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा त्यांनी विशेष गौरव केला.
विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मेजर जनरल नवनीत कुमार म्हणाले, कोरोनाच्या लढाईतील यौध्दांना बळ देणे हे आपले कर्तव्य असून पुणे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या 22 जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी सतत कार्यरत आहेत, सोबतच लॉकडाऊनच्या काळात शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी देखील अत्यंत समन्वयाने कार्य करत आहेत. या सेवा देणार्या कोरोना सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भारतीय सैन्य दलाच्या या उप्रकमाबाबत आभार व्यक्त केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त ( सामान्य ) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे, तहसीलदार मीनल भोसले, सहा.उप संचालक (आरोग्य) आडकीकर, उपसंचालक खांडकेकर, तहसीलदार मनिषा देशपांडे, लेखा अधिकारी गणेश सस्ते, नायब तहसीलदार बाळासाहेब क्षीरसागर, स्वीय सहायक अनिकेत जोशी, स्वीय सहायक संजय भुकण, अर्चना फडणीस, लिपिक सचीन सांगडे, वाहनचालक बाळू खाडे, शिपाई गुलाब गिजरे, शिपाई शरद टेकवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.