पुणे: महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले. पुणे प्रादेशिक संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. नाळे यांनी गेल्या दहा दिवसांत व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयातील सुमारे 1100 अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.
या संवादात मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), अनिल भोसले (कोल्हापूर) व सचिन तालेवार (पुणे) यांचाही प्रामुख्याने सहभाग होता. प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसामुळे किंवा वीजयंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. लॉकडाऊनमुळे काही मर्यादा असतानाही तो पूर्ववत करण्यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर केलेली कामे प्रशंसनीय आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक अभियंता व कर्मचारी तत्परतेने करीत असलेली कामे कौतुकास्पद आहेत. मात्र, यासोबतच अभियंता, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
या संवादामध्ये प्रादेशिक संचालक (प्र) श्री. नाळे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे आणि नियोजन आदींबाबत सूचना केल्या. तसेच शासनाने जाहीर केलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या रेड झोनमधील सर्व कार्यालयांचे पुन्हा निर्जंतुकीकरण करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना आदींबाबत सूचना केल्या. यासोबतच मानव संसाधन, लेखा व वित्त आदी विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महावितरणच्या ‘ऑनलाईन’ संगणक प्रणालीद्वारे सध्या ‘घरुनच काम’ (वर्क फ्रॉम होम) सुरु आहे. त्यांच्याही कामाचा आढावा श्री. नाळे यांनी घेतला.
वीजबिल ऑनलाईनद्वारे भरा:
लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांनी घरात राहून स्वतःची काळजी घ्यावी, तसेच वीजबिलांचा ऑनलाईनद्वारे भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र) श्री. नाळे यांनी केले आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर व मोबाईल अॅपवर ग्राहकांना वीजबिल पाहण्यासाठी व भरण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल क्रमांकांवर वीजबिलाचा ‘एसएमएस’ व रकमेचा भरणा करण्यासाठी लिंक पाठविण्यात येत आहे. या लिंकद्वारे ग्राहकांना त्यांच्या वीजबिलाची रक्कम भरण्याची थेट सोय आहे.
Excellent , writing truth word and real news ..
Thanks for your appreciation.