संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनिश्चितता होती. ही अनिश्चितता आता दूर झाली असून, वित्त विभागाने यंदा कुठल्याही प्रकारची नवीन पदभरती करायची नाही व अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्याही करणार नसल्याचे घोषित केले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाने तसे घोषित केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लॉकाडाऊन असल्यामुळे सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थितीही बोटावर मोजण्याइतकीच आहे. कामकाज ठप्प झाल्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. राज्याची आर्थिक घडी रूळावर आणण्यासाठी शासन विविध प्रकारच्या उपाययोजना आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतनही अर्धेच म्हणजे पन्नास टक्के अदा केले आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागातील वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये वगळता राज्यात कुठलीही पदभरती करण्यात येणार नाही. याबरोबरच राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्याही करण्यात येणार नाहीत, असे राज्य शासनाच्या वित्त विभागाने आज सोमवारी एक परिपत्रक काढून जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थेचा विषय असलेला बदल्यांच्या प्रकरणावर यावर्षी पडदा पडला आहे. विशेष म्हणजे नियतकालिक बदल्या शासनाने यंदा रद्द केल्यामुळे राज्य शासनाचे अंदाजे अडीचशे कोटी रूपये वाचणार आहेत.