# संघ लोकसेवा आयोगाने 31 मे रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 पुढे ढकलली.

 

नवी दिल्‍ली: कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाने आज विशेष बैठक घेतली. निर्बंधांच्या मुदतवाढीची दखल घेत आयोगाने निर्णय घेतला की सध्या परीक्षा आणि मुलाखत पुन्हा घेणे शक्य नाही. त्यामुळे 31 मे रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा भारतीय वन सेवा परीक्षेची पात्रता परीक्षा देखील असल्यामुळे भारतीय वन सेवा परीक्षेचे वेळापत्रकदेखील पुढे ढकलण्यात आले आहे.

दरम्यान, 20 मे 2020 रोजी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि या परीक्षांच्या नव्या तारखा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या संकेतस्थळावर आगामी काळात अधिसूचित केल्या जातील.  आयोगाने यापूर्वीच नागरी सेवा परीक्षा 2019 साठी उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी; भारतीय वित्तीय सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 साठी अधिसूचना; संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 साठी अधिसूचना, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा, 2020 साठी अधिसूचना आणि एनडीए आणि नेव्हल अकॅडमी परीक्षा 2020 या परीक्षांना स्थगिती दिली आहे. याबरोबरच स्थगित केलेल्या परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्यावर उमेदवारांना किमान 30 दिवस अगोदर कळवण्यात येईल, असेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *