मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज मंगळवारी ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ३४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे.
आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २६, पुण्यातील ६, औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये (८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.