# राज्यातील सहकारी संस्थांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ कोटींची आर्थिक मदत.

 

मुंबई: कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी आतापर्यंत २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन भरीव आर्थिक मदत केली आहे. सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड – १९ या नावाने आर्थिक मदत करण्याबाबत सहकारी संस्थांना यापूर्वी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्यातील सुमारे ३,७९० सहकारी संस्थांनी रु २५ कोटी एवढा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आतापर्यंत दिला आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – रु. २.० कोटी, सांगली जि.म.स. बँक, रु. २.० कोटी, सातारा जि.म.स. बँक, रु. १.० कोटी, लातूर जि. म. स. बँक, रु १.११ कोटी, ठाणे जि. म.स.बँक रु.१.० कोटी, ज्ञानदिप नागरी सहकारी पतसंस्था, मुंबई, ५१.० लाख, शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था, मुंबई – ४१.० लाख या प्रमुख सहकारी संस्थांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त राज्यातील ३०६ बाजार समित्यापैकी ६१ बाजार समित्यांनी या निधीला रु. १.२३ कोटी असे एकूण सुमारे रु २६.० कोटीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे.

श्री. पाटील म्हणाले, राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची व्याप्ती विचारात घेता अशा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी राज्यातील सहकारी संस्थांनी सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून आर्थिक मदत करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम- ६९ मधील तरतुदींनुसार धर्मादाय / सार्वजनिक प्रयोजनासाठी निव्वळ नफ्याच्या २० % मर्यादेपर्यत निधी खर्च करण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर कोविड – १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने सहकार कायद्यातील कलम – ६९ मधील तरतुदींना ९ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशाने सुट दिली आहे. त्यामुळे या कारणासाठी आर्थिक मदत देण्यास इच्छूक असलेल्या सहकारी संस्थांना संघीय संस्थेची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही.

राज्यातील सुमारे २.० लाख सहकारी संस्थांपैकी आतापर्यंत सुमारे ३,७९० सहकारी संस्थानी यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य सहकारी संस्थांनीसुद्धा यासाठी भरीव आर्थिक मदत करावी, असेही श्री. पाटील यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *