# मुंबईसाठी संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता.

 

मुंबई:  मुंबईमध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाशी संबंधित रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून शेवटचा पर्याय म्हणून त्याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी येथे दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोना उपाययोजनांचा आढवा घेतला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह आरोग्य विभगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. महाराष्ट्रातील रेड झोनमधील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त देखील यावेळी सहभागी झाले होते.

जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र, ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना रेल्वेने खास तयार केलेल्या रेल्वे डब्यातील विलगीकरण कक्षात ठेवले जाण्याबाबत यावेळी चर्चा झाली. गरज भासल्यास त्याचा वापर करावा या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली जाईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत जो प्रोटोकॉल आहे तो बदलण्याचा विचार आयसीएमआरच्या स्तरावर सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. कोरोना सोबतच अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी राज्यात प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

थुंकण्यास प्रतिबंध करणारा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार:
महाराष्ट्राने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला आहे त्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी राज्यात केली जाईल, असेही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी विचारणा केली होती. त्यानुसार या मार्गदर्शक सूचनांचा वापर करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांनी आपला आजार लपवू नये यासाठी विशेष करून वर्तुणुकीतील बदलाबाबतच्या संवादासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *