# औरंगाबादेत 35 रुग्णांची वाढ, तिघे कोरोनामुक्त; एकूण 356 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 34 आणि ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 356 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (07), कबाडीपुरा (05), दत्त नगर-कैलास नगर (04), बायजीपुरा (05), संजय नगर, मुकुंदवाडी (07), पुंडलिक नगर (03), बेगमपुरा (01), रेल्वे स्टेशन परिसर (01), कबीर नगर, उस्मानपुरा, सातारा रोड (01) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, एमआयडीसी येथील एका रुग्णाचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

आज तिघाजणांचे दुस-या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना मिनी घाटीतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत 28 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या मिनी घाटी रुग्णालयामध्ये 149 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मिनी घाटीत 43 जणांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत. ते येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

घाटीत 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण:
घाटी रुग्णालयात दुपारी चार वाजेपर्यंत 53 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 22 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 09 जणांचा येणे बाकी आहे. दोन पॉझिटिव्ह रुग्णामध्ये जय भीमनगर येथील 75 आणि 65 वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. तसेच 76 वर्षीय जय भीमनगर येथील महिला रुग्ण किलेअर्क येथील मनपाच्या कोवीड केअर सेंटरमधून घाटीत संदर्भीत करण्यात आले आहे. तर घाटीत संदर्भीत करण्यात आलेल्या एसआरपीएफ कॅम्प हिंगोली येथील 35 वर्षीय पुरूष कोरोना रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे घाटीच्या डेडिकेटेड कोवीड रूग्णालयात 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 21 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. घाटीत 52 कोरोना निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 17 कोरोना निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *