पुणे: लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली पासपोर्ट सेवा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच सुरू होणार आहे. मात्र, रेड झोनमध्ये पासपोर्ट सेवा पूर्णपणे बंदच राहणार आहे. यासाठी पुणेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असले तरी पुणे विभागातील सांगली, कोल्हापूरकरांना मात्र अपाॅइंटमेंट मिळणार आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पासपोर्ट अपॉइंटमेंटही थांबविण्यात आल्या होत्या. तसेच देशभरातील पासपोर्ट ऑफिसेस बंद ठेवण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर १७ मे पर्यंत रेड झोनमधील पासपोर्ट सेवा बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. १७ मे नंतर रेड झोनबाबत होणार्या निर्णयावरच नागरिकांना पासपोर्टसाठीच्या अपॉइंटमेंटसाठी ऑनलाइन अर्ज करायचा की नाही हे स्पष्ट करण्यात येईल.
सध्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासही बंद ठेवण्यात आला आहे. तरीही पासपोर्ट नुतनीकरण करण्याच्या तारखा अनेकांच्या जवळ आल्या आहेत. तर काहींच्या उलटून गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना देखील नवीन शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने पासपोर्ट काढायचे आहेत त्यामुळे पासपोर्ट अपाइंटमेंट प्रक्रिया सुरू केंव्हा होणार, याचीच अनेकांना प्रतीक्षा आहे. त्यातच आता केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांचे वर्गीकऱण रेड, ऑरेंज, ग्रीन झोन असे केले आहे.
पुणे विभागातील सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व नगर येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळू शकेल. याबाबत पुणे विभागाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले म्हणाले की, पुणे विभागांतर्गत येणारी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ७ मे पासून सुरू केली. मात्र, रेड झोनमधील कार्यालये सुरू होणार नाहीत.