पुणे: लॉकडाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधून आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
या मजुरांना पाठविण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोविड-१९ च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.
त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे उद्योगधंदे सुरु असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली. तथापि, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, आज या मजुरांना रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.