पुणे: सेट-नेट ची तयारी करण्यासाठी हैदराबाद येथे गेलेल्या व मागील दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या ४९ महाविद्यालयीन युवतींना खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात परतणे शक्य झाले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून क्लाससाठी गेलेल्या या मुली आपापल्या घरी पोहोचल्यानंतर त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनीही सुळे यांचे आभार मानले आहेत.
या सर्व मुलींसोबत असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रज्ञा साळुंखे आणि येवला तालुक्यातील विद्या मामुडे या युवतींनी याबाबत सविस्तर माहिती दिली. या सर्व मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत. सर्वजणी शास्त्र शाखेच्या पदव्युत्तर पदवीधारक असून सेट-नेट ची तयारी करत आहेत. त्यासाठी हैदराबाद येथील एका संस्थेत क्लाससाठी त्या गेल्या होत्या. क्लासचा कालावधी संपला असतानाच कोरोना विषाणूमुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली; आणि या मुली हैदराबाद येथेच अडकून पडल्या. तेव्हापासून गेला दीड महिना त्या महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रयत्न करत होत्या.
एकाच गावात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे शक्य नसताना या मुलींना राज्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात आणणे महाकठीण काम होते. अखेर या मुलींनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि आपल्याला महाराष्ट्रात येण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. त्यानुसार सुळे यांनी लागलीच तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून याबत माहिती देत दोन्ही राज्यांच्या प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि काल या मुलींसाठी राज्याची सीमा ओलांडून जाण्यासाठी विशेष परवानगी मिळवली. त्यानुसार काल संध्याकाळी या सर्व मुली हैदराबादहून रवाना झाल्या आणि आज राज्यातील आपापल्या घरी पोहोचल्या.