# औरंगाबादेतील घाटीत कोरोनाबाधित महिलेची प्रसूती; बाळ-बाळंतीन सुखरूप.

 

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) करिम कॉलनी, रोशन गेट येथील 30 वर्षीय कोरोनाबाधित महिलेची आठ मे रोजी प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न झाले. दोघीही सुखरूप आहेत. त्यांची तब्येतही ठीक असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी सांगितले.

स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा म्हणाले, सदरील महिला तिच्या चौथ्या प्रसूतीसाठी विभागात दाखल झाल्या. त्या कटेन्मेंट झोनमधील असल्याने त्यांना स्वतंत्र कक्षात भरती केले गेले. त्यांच्या लाळेचे नमुने घेतले. तो अहवाल काल 8 मे रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महिलेला पुढील उपचारासाठी डीसीएचमध्ये हलविले आहे. औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य, नवजात शिशु शास्त्र विभागप्रमुख डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह त्यांची टीम बाळ-बाळंतीन यांची काळजी घेताहेत. बाळाचे वजन 3.7 किलोग्रॅम आहे,असेही डॉ.गडप्पा म्हणाले.

घाटीत 42 कोरोना रुग्णांवर उपचार:
घाटीच्या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये (डीसीएच) 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 39 रुग्णांची स्थिती सामान्य, तर तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. 38 कोरोना निगेटिव्ह रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. 23 कोरोना निगेटिव्ह बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
शहरातील सिल्क मिल कॉलनीतील 60 वर्षीय महिला, मकसूद कॉलनी , सिकंदर पार्क येथील 37 वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील रामनगरच्या 80 वर्षीय पुरुष, किलेअर्कमधील 35 वर्षीय महिला, जुना बाजारातील 75 वर्षीय पुरूष आणि गंगापुरातील फुलशेवडा जि.प शाळा येथील 76 वर्षीय पुरूष या रुग्णांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच पुंडलिकनगर येथील 58 वर्षीय महिला रुग्णास घाटीतून मिनी घाटीत काल (8 मे रोजी) संदर्भीत करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत 43 रुग्णांचे स्क्रीनिंग झाले. 18 रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 97 रुग्ण भरती असल्याचे डॉ.येळीकर, माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.

रुचा कंपनीकडून रोबोट भेट:
वाळूजच्या रुचा इंजिनियरर्स प्रा.लि कंपनीकडून घाटीतील कोरोना रुग्णांसाठी अत्याधुनिक असा रोबोट भेट देण्यात आला. औषध पुरविणे, कक्षामधील सॅनिटायझेशन करणे, रुग्णांच्या खाटापर्यंत सेवा देण्याचे काम या रोबोटकडून होऊ शकते, असे मत डॉ.येळीकर यांनी व्यक्त करत या कंपनीचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *