# कोरोना काळातील महिलांची घुसमट..!

 

मी एक सर्वसामान्य महिला म्हणजे तसं माझं नाव, गाव परिचय फारसा महत्वाचा नाही कारण महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्या पाड्यात, शहरांच्या झोपडपट्टीपासून ते आलिशान बंगल्यापर्यंत कुठेही मी तुम्हाला सहजच सापडू शकते. मी खेडूत, निरक्षर, दलित, बहुजन, आदिवासी म्हणून सापडू शकते, इतकेच काय कदाचित संख्येने कमी असेल पण अगदी उच्च विद्याविभूषित, नोकरदार अन् उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतसुद्धा मी सापडू शकते.  या देशात गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्वच स्तरात मी सहजच सापडू शकते. का नाही सापडणार? या देशाचा अर्धा भाग आहे ना मी ! पण मी जात आणि पुरुषसत्तेच्या चक्कीत पिसली जाणारी, अगदी तळाच्या, तळातील शोषित सर्वसाान्य स्त्री ही माझी ओळख अजुनही पुसली गेलेली नाही .

जगावर कधी नव्हे ते इतके महाभयानक संकट आले आहे. माझी पणजी पटकीच्या गोष्टी सांगायची त्याची आठवण व्हावी अशी ही साथ. जगभर या कोरोनामुळे पटापट माणसं मरत आहेत. सध्या देशात आणि राज्यात सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन जाहीर झालंय. पोट भरण्यासाठी गाव सोडून शहरांत गेलेल्या माझ्यासारख्या कितीतरी गोरगरीब मजूर स्त्रिया उपाशी पोटी आपल्या नवऱ्याच्या मागे, लेकीबाळीसह गाव गाठण्यासाठी पायी निघाल्या. पुरुषही पायी चालले ना; पण
‘बाई ‘ असणं म्हणजे नेहमीच थोडे जास्तीचे भोग वाट्याला येणं असतं जेव्हा जेव्हा निसर्ग संकटांचे माप मानवाच्या ओटीत टाकतो तेव्हा तेव्हा स्त्री म्हणून स्त्रीच्या पदरात  थोडे जास्त माप पडते दुःखाचे ! दंगल, दुष्काळ, महापूर असो की मग कोरोना असो, स्त्री म्हणून आमच्या पदरात टाकलेच जाते संकटांचे माप थोडे जास्तीचे!  शेवटी काय निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित प्रत्येक घटनेला विशेष संदर्भ असतात स्त्रीत्वाचे ! शेकडो, हजारो मैल चालत पुरुषही गेले, आम्हीही गेलो, पाय त्यांचेही उधडले अन् आमचेही; तरीही आमच्या आणि त्यांच्या चालण्यात थोडा फरक होताच! स्त्री म्हणून आमच्या  डोक्यावर संसाराचं ओझं होतं. कडेवर लेकराचं ओझं, इतकंच काय  सात-सात, आठ-आठ महिन्यांच्या गरोदर बायकासुद्धा शेकडो मैल पायपीट करत गेल्या!   बारा-तेरा  वर्षांच्या कोवळ्या पोरींपासून ते चाळिशी पर्यंतच्या बायकांपर्यंत ‘त्या’ चार दिवसात मांड्या सोलवटून निघाल्या तरी घराच्या ओढीने चालत राहिलेल्या बायकांच्या वेदना समजून घेणं सोप्पं नाही! स्त्री, मग ती राज्यातली असो की परराज्यातील, मैलोन् मैल चालत निघालेल्या सगळ्या स्त्रियांच्या  वेदनांची जातकुळी एकच होती.  लॉकडाऊन जाहीर झालं अन् हातावर पोट असणाऱ्या माणसांचं जगणं सुद्धा एका अर्थाने घरात बंद झालं. रोज मिळवायचं अन् रोज खायचं असं  ‘ताजं जगणं’ जगणाऱ्या माणसांकडे कसला अालाय ‘ठीवासापटा’ ? मजूर म्हणून सर्वांच्या असतातच; पण स्त्रीमजूर म्हणून आमच्या वेदना थोड्या अधिकच्याच आहेत!  आमच्या पोटात भूक असली तरी निसर्गाने आम्हाला मातृत्वही दिलंय, अगदी भुकेच्याही पलीकडचं ! म्हणूनच लेकरांच्या भुकेपुढं आपली भूक दडपून त्यांच्या ताटात घास तुकडा घालण्याची किमया सहजसाध्य आहे माझ्यासारख्या गोरगरीब स्त्रियांना!

मी चांगली शिकली सवरलेली, समाजाच्या नजरेत चांगल्या खात्या पित्या घरची! चार भिंतीच्या आत कितीही दुःख असलं तरी बाहेर मात्र हसत मुखाने वावरण्याचे संस्कार कुटून कुटून आमच्या मनात भरलेले असतातच. आपल्याकडे एक म्हण आहे ‘पावसानं झोडपलं अन् नवऱ्यानं मारलं तर दाद कुणाकडे मागायची ? ‘तसंही इथे बायकोला मारायला नवऱ्याला, भाजीतल्या मिठापासून ते संशयापर्यंत कोणतंही कारण पूरतं!  मार खातानाही घरातल्या टिव्हीवरच्या गाण्यांचा आवाज वाढवून त्यात माझ्या रडण्याचा आवाज लपवणारी मी!  एरव्ही फक्त रात्रीच मार खावा लागत असला तरी, नवरा कामावर गेल्यावर दिवसाचे निदान आठ तास तरी मोकळा श्वास घेता यायचा.  पण या लॉकडाऊनमध्ये चोवीस तास घरात अडकलेला नवरा अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा त्रागा करतो. तो मोबाईलवर चॅटिंग करत असताना मी समोर का आले? तो कुणाशी बोलताना मी का आले ? त्याला कुणाशी बोलायचं असतं हे काय मला कळत नाही का? पण काही गोष्टी कळूनही टाळायचं अंगवळणी पडलंय! काहीही केलं, कितीही चांगलं वागल तरी ते त्याला खटकणारच ! लॉकडाऊनला जणू कोरोना नाही मीच जबाबदार आहे अशा रागाने, कोरोनावरचा राग तो माझ्यावर काढत, मार मार मारतो!  असा मार खाणारी मी एकटीच नाही हे मला माहिती आहे. कौटुंबिक हिंसाचार सोसणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी आहेत. त्यासाठी पोलिसात तक्रार करण्याची सोय आहे, पण आजही १०० नंबर फिरवण्याचं धाडस न होणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी आहेत. कारण त्यांना आपल्या लेकरांसाठी संसार टिकवायचाय. कुणी म्हणेल एवढे सगळे कायदे असताना का उगीच रडगाणे गाता? पण खरं सांगू कायदे कितीही कठोर असले तरी समाज त्याहून कठोर असतो. एकट्या बाईला जगणं नकोसं करणाऱ्या नजरा आजही कमी नाहीत. म्हणूनच नवऱ्याशी भांडून घर सोडून जायचं, एकटं राहायचं धाडस होत नाही. आणि शेवटी मुलांचे भविष्य असतेच ना !!

शेजारी राहणाऱ्या वहिनी नेहमी सांगायच्या, त्यांचा नवरा त्यांना घरकामात मदत करतो म्हणून पण मला कधी खरं वाटलं नाही. पण या लॉकडाऊनच्या काळात वहिनींना, अगदी बाहेर नळावर धुण्या-भांड्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत, न लाजता मदत करणारा त्यांचा नवरा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. असे चांगले नवरे अनेक घरात असतीलच, समाजात स्त्रियांना सन्मान देणारे, बायकोला आपली जीवनसाथी समजणारे अनेक पुरुष आहेत हे या लॉकडाऊनने दाखवून दिले. सुखी संसाराचे असे सुंदर चित्रही याच काळात दिसले. मात्र, दुसरीकडे,  बायकोला गुलाम समजणारे पुरुष देखील दिसले. दिवसभर राबून, चोवीस तास स्वतःच्याच घरात, मारझोड करणाऱ्या नवऱ्यासोबत काढणं, त्याची जेव्हा जेव्हा बायकोला मारण्याची इच्छा होईल तेव्हा मुकाट मार खाऊन घेणं अन् जेव्हा जेव्हा नवऱ्याच्या मनात येईल तेव्हा तेव्हा त्याच्या इच्छाश्य्येवर स्वतःच्या इच्छेविरुद्ध यंत्रवत  झोकून देणे, बाईपणाचे असे काटेरी भोग भोगणं सोप्पं नाही! आधीही बाईपणाचे भोग होतेच, पण त्यात थोडी भरच पडली, या काळात!

आमचं लग्न झाल्यानंतरचे नव्याचे नऊ दिवस सोडले तर आयुष्यात एकही दिवस कधी सुखाचा आनंदाचा आणि नवऱ्याचा मार न खाता गेला नाही. मात्र, लॉकडाऊनच्या काळात सुखाचे दिवस नशिबी आले. कारण नवऱ्याचं घराबाहेर पडणं बंद झालं  अन् आपोआपच दारुही बंद झाली !  याच काळात नवरा, ‘माणूस’   म्हणून पुन्हा नव्याने समजला. हे ही  समजलं की त्याला खरंच बायकोबद्दल, मुलांबद्दल, घराबद्दल प्रेम वाटतं पण दारू त्याला व्यक्त करू देत नाही!  या लॉकडाऊनच्या काळात सगळे दुकान, सगळे व्यवहार, बाहेर फिरणं आणि विशेष म्हणजे दारू बंद झाली अन्  त्याची दारू काही दिवस तरी सुटली!  या काळात माझ्या नवऱ्याला मी हसताना पाहिलं! मुलांशी प्रेमाने बोलताना पाहिलं! माझ्याबद्दल त्याच्या डोळ्यात असणारे प्रेमही मला याच काळात दिसलं!  रोज चटणी भाकरी खाऊनसुद्धा आमचं घर हसत  खेळत राहिलं.  मुलांना बाप म्हणून, बापाचं मायाळू रूप दिसलं अन् मलाही माझं प्रेमळ नवरा कितीतरी वर्षांनी पुन्हा भेटला. नाही म्हटलं तरी तसा दारुसाठी अस्वस्थ होणारा आणि अंगणात येरझारा घालणारा नवरा मी पाहिला पण तो तेवढ्यापुरताच! पुन्हा तो आमच्याशी मायेने वागायचा.  गेल्या काही  दिवसात त्याने मला अजीबात मारलं  नाही, की लेकरांच्या अंगाला पाच बोटं लावली नाहीत!  माझ्या लग्नापासून हे आनंदाचे दिवस मला पहिल्यांदा पाहायला मिळाले. या  दिवसात मी खऱ्या अर्थाने संसार केला. अंगावरच्या जखमांचे, माराचे वळ बुजत आले होते.  वाटलं कायमची ही दारू नावाची अवदसा आमच्या घरातून गेली तर मी आणि माझ्यासारख्या कितीतरी बायका खरंच  सुखी होतील!

मला महसूल, आर्थिक आणीबाणी असे मोठे मोठे शब्द नाही कळत! एक मात्र कळतं की, पैशाचं सोंग करता येत नाही अन् त्याच्याशिवाय संसाराचा गाडा हाकत येत नाही हे  नक्कीच! चार माणसाचे घर चालवताना किती कसरत करावी लागते हे मला काय माहिती नाही का?  मी  बातम्यांमध्ये, मोठ्यामोठ्या चर्चांमध्ये ऐकलं राज्याची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी दारूची दुकाने सुरू झाल्यास त्यातून मिळणाऱ्या महसुलातून उभा राहणारा पैसा राज्याच्या कारभार चालवण्यास उपयोगी पडेल. गावातील दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही बायका खूप झगडलो पण फक्त बायकांनी दारूबंदी करून उपयोग नाही. दारूबंदी तर दारू पिणाऱ्यांनी  केली पाहिजे! आणि ते करत नसतील मायबाप सरकारने केली पाहिजे .

सगळेच दारू पिणारे वाईट असतील असं मला अजिबात म्हणायचं नाही. काहीजण दारू पिऊनही त्यांचा संसार व्यवस्थित चालवतात.  बायकोला, मुलांना मारहाण करत नाहीत असं मी ऐकलंय. कदाचित ते स्वतःच्या आनंदासाठी दारू पित असतील, अशा या महागड्या दारूतून देशाला महसूल मिळतही असेल पण आमच्या खेड्यापाड्यातून या देशी दारूच्या दुकानात दारू पिणाऱ्या माणसाकडे पाहतांना, ते केवळ आनंदासाठी दारू पितो असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उलट त्यांच्या पिण्याने घराच्या आनंदाची राखरांगोळी होते. स्त्रियांसाठी अनेक कायदे होत आहेत, पण आजही घरात दारुड्या नवऱ्याचा मार खाणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया आहेत. अनेकदा आमच्यासारख्या अबला स्त्रियांच्या उद्धारासाठी शासन उदार हस्ते सबलीकरणाच्या योजना राबवते.  त्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्चदेखील शासनाला करावा लागतो आणि हा खर्च करण्यासाठी महसुलातून मिळणारा पैसा हा एक मार्ग असतो. आम्हाला हतबल, अबला बनवण्यात नवऱ्याच्या दारूचा फार मोठा हात आहे. त्याच्या हातातला दारूचा ग्लास जर काढून घेतला तर आमचे खूप मोठे दुःख हलके होईल .

आज रेड झोनमधली वगळता अनेक ठिकाणी दारूची दुकानं उघडली आणि मागील काही दिवसात माझ्या घरात निर्माण झालेला आनंदाचा ग्रीन झोन, त्यामधील माझ्या हसर्‍या मुलांचे चेहरे काळजीने कोमेजून गेले! गेल्या चाळीस दिवसांची दारू पिण्याची कसर आज पूर्ण करणार असे म्हणतच नवरा आनंदाने दारूच्या दुकानाच्या रांगेत जाऊन उभा राहिलाय. दारूची अन् बायकोला मारण्याची कसर आता तो नक्की काढणार! अंगावरच्या जखमा पुन्हा हिरव्या पिवळ्या होणार! ज्या घरात लोकं आनंदासाठी दारू पीत असतील तिथे पिऊ द्या, पण आमच्या सारख्यांच्या घरात दारू म्हणजे शाप आहे. त्या शापातून मुक्त होता आलं तर किती बरं होईल..!
-प्रा. डॉ. सुनीता बोर्डे, सांगली
(लेखिका सांगलीतील श्रीमती सी.बी. शाह महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख आहेत.)
ईमेल: sunitaskhadse11878@gmail.com
मोबाईल: 9405286114