संग्रहित छायाचित्र
पुणे: उन्हाच्या चटक्याने गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाही लाही होत असताना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. मान्सून 16 मे पर्यंत बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागाबरोबरच अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण भागावर दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सध्या अशीच स्थिती पुढील काही दिवस कायम राहिली तर केरळच्या किनारपट्टींवर वेळेच्या आधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
देशाच्या सर्वच भागात सध्या सूर्य आग ओकत आहे. तर काही भागात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. सध्या कमाल तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचला असून, येत्या काही दिवसात त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या कॉमोरीन आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. दक्षिण अंदमान, सुमात्रा बेटांची किनारपट्टी, तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागावर 13 मे पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पुढील काही दिवसात त्याचा प्रभाव वाढणार आहे. पुढील 72 तासात हेच कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातील दक्षिण मध्य भागावर असणार आहे. बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, दक्षिण अंदमान, निकोबार बेट या भागात 16 मे पर्यंत मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. स्थिती अनुकूल राहिली तर मान्सूनची पुढील वाटचाल सोपी होणार आहे.