# महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे योगदान महत्त्वाचे; राजर्षी शाहू अध्यासनाच्या ऑनलाईन व्‍याख्‍यानमालेतील सूर.

 

औरंगाबाद: आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात घेतलेल्या पुरोगामी कारभाराचे प्रतिबिंब उमटलेले आहे, असा सूर राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या व्याख्यानमालेत निघाला.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्‍या ९८ व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित राजर्षी शाहू महाराज अध्‍यासन केंद्रातर्फे लॉकडाऊनच्‍या काळात ऑनलाईन व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले होते. या व्‍याख्‍यानमालेच्‍या प्रारंभी अध्‍यासन केंद्राचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी प्रास्‍त‍ाविक केले. यानंतर डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी ‘राजर्षी शाहूंचे विचारसूत्र, भारतीय राज्‍यघटना व लोकशाही’ याविषयावर पहिले पुष्‍प गुंफले.

याप्रसंगी डॉ. सोलापुरे म्‍हणाले, ‘भद्राय राजते’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्‍याणकारी, रयतेच्‍या राज्‍याची संकल्‍पना खऱ्या अर्थाने छत्रपती राजर्षी शाहूंनी करवीर संस्‍थानात अस्तित्‍वात आणली. लोक सुखी, समाधानी व्‍हावेत यासाठी त्‍यांनी आपले राज्‍य चालवले. ते लोकांशी बांधील असणारे राजा होते. त्‍यांनी सामाजिक लोकशाहीची पायाभरणी केली होती. त्‍यांच्‍या राज्यकारभारात स्‍वातंत्र्य, समता, बंधुता, न्‍याय, व्यक्तिप्रतिष्‍ठा, सहिष्‍णूता इ. लोकशाही मूल्‍ये होती. एका अर्थाने त्‍यांनी राजेशाहीच्‍या आवरणात लोकशाही चालवली. त्‍यांना भलेही राजकीय लोकशाही निर्माण करता आली नसेल, पण भारतातील सामाजिक कायद्याचे ते जनक होते. त्‍यांनी मर्यादित राजसत्‍ता ठेवून जबाबादारीचे तत्‍त्व स्‍वीकारले. त्‍यासाठी लोककल्‍याणाचे कायदे संमत करून कायद्यापुढे समानता व सर्वांसाठी समान कायदा या तत्‍त्वाचा अंगीकार केला. शिवाय न्‍याय, स्‍वातंत्र्य, अधिकार या तत्त्‍वांचा स्‍वीकार करत असताना ५०% आरक्षण लागू केले. याचा परिणाम आधुनिक भारताच्‍या लोकशाही व राज्‍यघटनेवर पडल्‍याचे दिसते, असेही ते म्‍हणाले.

‘राजर्षी शाहूंचा वसा आणि वारसा’ या विषयावर दुसरे पुष्‍प गुंफताना डॉ.विश्‍वाधार देशमुख यांनी शाहूंचे तत्‍त्‍वज्ञान, व्‍यवहार व प्रत्‍यक्ष कार्य या टप्‍प्‍याद्वारे मांडणी केली. ते म्‍हणाले, इतिहास होऊन गेलेल्‍या महामानवांचे नेमके काय करायचे हा प्रत्‍येक पिढीसमोर प्रश्‍न असतो. एकतर त्‍यांना विस्‍मृतीकोशात टाकणे वा त्‍यांची पूजा बांधणे, पुतळे उभारणे किंवा त्‍यांचे विचार वा केवळ नैमित्तिक स्मरण करणे किंवा कार्य समकाळाच्‍या कसोटीवर पुण्‍यपाथेय म्‍हणून स्‍वीकारणे, असे पर्याय नव्‍या पिढीसमोर असतात. शाहूंनी धर्म, ईश्‍वर, जात संदर्भाने समन्‍वयाचा सुवर्णमध्‍य साधला होता. त्‍यांनी वेदोक्‍ताचा आग्रह धरला, पण माणसाला महत्‍त्व दिले. अस्‍पृश्‍यांच्‍या उद्धारासाठी, समता स्‍थापनेसाठी संस्‍थानातील ब्राह्मणांची टक्‍केवारी कमी केली, अधिकाराच्‍या जागा ब्राह्मणेतरांना दिल्या. जातनिहाय वसतिगृहांची स्‍थापना केली. परस्‍पर विरोध नव्‍हे तर समन्‍वय, परंपरांना पूर्ण अव्हेरून नव्‍हे तर त्‍यांना वेगळे वळण दिले. रयतेचे कल्‍याण व आपण सारे या तत्‍त्‍वांचा स्‍वीकार केला. ही तत्‍त्‍वेच आजच्‍या पिढीसाठीचा वसा आणि वारसा आहे, असेही ते म्‍हणाले.

‘आधुनिक महाराष्‍ट्राच्‍या जडणघडणीत राजर्षींचे योगदान’ या विषयावर तिसरे पुष्‍प गुंफतांना प्रा. रणधीर शिंदे म्‍हणाले की, शाहू महाराजांच्‍या जीवनाकडे व कार्याकडे इतिहासकारांनी सम्‍यक, सर्वंकषदृष्‍टीने पाहिलेले नाही. नव्‍हे तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आपल्‍याकडे इतिहासलेखन हे बऱ्याचदा बाधितदृष्‍टीने झालेले आहे. या इतिहास लेखनावर जात व वर्गसंबंधाचा प्रभाव जाणवतो. सबंध भारतभरामध्‍ये राजेशाहीचा इतिहास हा अतिशय रंजक वाटावा अशा स्‍वरूपाचा होता. ५६० पेक्षा अधिक संस्‍थाने भारतभरामध्‍ये होती. पैकी बहुतांश संस्‍थांनांचा इतिहास हा राजेरजवाड्यांचा इतिहास हा वैभवाचा, ऐश्‍वर्याचा व हंड्या-झुंबरांचा होता; पण याला बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड व राजर्षी शाहूंसारखे राजे अपवाद होते. शाहूंसमोर परकीय सत्ता, ब्राह्मणशाही व नोकरशाही यांची आव्‍हाने होती. त्‍यांच्‍याशी संघर्ष करीत त्‍यांनी शेती, उद्योगधंदे, शिक्षणासाठी प्रयत्‍न केले. सोबतच जाति‍व्‍यवस्‍थेचे निर्मूलन व बहुजनांच्‍या उद्धारासाठी अनमोल कार्य केले. ज्‍याचा आधुनिक महाराष्‍ट्राच्‍या जडणघडणीत मोठा वाटा राहिलेला आहे.

व्‍याख्‍यानमालेचा अध्‍यक्षीय समारोप करताना कुलगुरू प्रा.प्रमोद येवले म्‍हणाले, महापुरूषांचे कार्य नव्‍या पिढीला समजावे या हेतूने महापुरूषांची जयंती, पुण्‍यतिथी आयोजित केली जाते. शाहूंनी अस्‍पृश्‍यता निवारण, प्राथमिक शिक्षण व जातीभेद निर्मूलनाचे कार्य केले. इंग्लिश संस्‍कृत, राज्यशास्‍त्र इत्‍यादी विषयांचा अभ्‍यास केला. सध्‍याच्‍या कोरोनासारखी दुष्‍काळ व प्‍लेग अशी आपत्‍ती शाहू महाराजांच्‍या काळातही आली होती. त्‍यावर त्‍यांनी यशस्‍वीरीत्‍या मात केली. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्‍याशिवाय समाज सुधारणा होणे शक्‍य नाही. यादृष्‍टीने त्‍यांनी संस्‍थानामध्‍ये प्राथमिक शिक्षण सक्‍तीचे केले. खेड्यापाड्यातील मुलांना उच्‍चशिक्षणाच्‍या सुविधा मिळाव्‍यात म्‍हणून जातिनिहाय वसतिगृहांची स्‍थापना केली. यामुळे अनेक पिढ्या शिक्षण घेऊन तयार झाल्‍या. तसेच मागासवर्गासाठी राखीव जागा ठेवल्‍या, त्‍यांना विविध प्रकारच्‍या नोकऱ्या दिल्‍या अशाप्रकारच्‍या सुधारणा करणारे ते पहिले संस्‍थानिक होत, असेही ते म्‍हणाले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, डॉ.जिजा शिंदे, उत्‍कर्ष अंभुरे बाळासाहेब बुधवंत यांनी विशेष प्रयत्‍न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *