संग्रहित छायाचित्र
बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय हयात संघर्षाने भरलेली होती. अखेरच्या क्षणी देखील विरोधकांसोबतच स्वकियांनीच छळले. आज या लोकनेत्याची संघर्षकन्या पंकजा मुंडे लोकनेत्या झाल्या, तरी त्यांच्याही वाटचालीत विरोधकांबरोबरच स्वकीय आणि घरभेदीच काटेरी वाट करू लागले आहेत. विधान परिषदेच्या रणांगणाने हे पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे.
कुठलाही राजकीय वारसा नसताना आणि आर्थिक बाजू देखील कमकुवत असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे आयुष्यवर संघर्ष करून पक्षाला मोठं करतानाच सामान्य जनतेच्या ह्रदयात पोचले नव्हे स्थिरावले आणि भल्या भल्या राजकीय धुरंधरांना आस्मान दाखवून या नेत्याने राज्यात बस्तान बसवितानाच राष्ट्रीय नेतृत्वाची चुणूकही दाखविली. कम्युनिस्टांचा व नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतानाच त्यांनी राजकारणात घेतलेली गरडझेप भल्याभल्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. मात्र, सत्तेसाठी अखेरपर्यंत संघर्ष करताना कुटुंबात दरी पाडण्यात राजकीय विरोधक यशस्वी ठरले.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लेक पंकजा मुंडे बाबांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या व त्यांनी राजकीय लढाई जिंकली देखील. मात्र, केंद्रात सत्ता व वाट्याला मंत्रिपद येऊनही गोपीनाथ मुंडे राजकीय सारीपाटावरील वजीर अपघाताचे बळी ठरले. बापाच्या निधनाच्या दु:खातून सावरत लेक पंकजा मुंडे राजकीय वारसा चालविण्यासाठी सज्ज झाल्या व त्यांनी महाराष्ट्रभर संघर्षयात्रा काढून विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या राजकीय अस्तित्वाची चुणूक दाखवून दिली व बाबांकडूनच राजकीय वारसा घेतलेल्या पंकजा मुंडे बाबांप्रमाणेच संघर्षशील व स्वअस्तित्व सिद्ध करण्याऱ्या नेत्या ठरू लागल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला मान्य करत मराठवाड्यात ४६ जागांवर उमेदवार निवडूण आले. भाजपाच्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आले. समाजाभिमुख नेतृत्व अशी ओळख झालेल्या पंकजा मुंडेंना मंत्रिपदही देण्यात आलं. परंतु अवघ्या काही महिन्यांतच पक्ष नेतृत्वात पंकजा मुंडे सरस ठरू लागल्याने त्यांचे राजकीय विरोधकही वाढले आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव झाला. पराभव जिव्हारी लागल्याने पुढचा काही काळ त्या मतदारांपासून दूर गेल्या. मात्र, लगेच सावरत त्यांनी सक्रिय होण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीत स्वकियांशी झालेल्या सामन्यात पक्षातील स्वकियांनी विरोधकांची भूमिका बजावल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे व्यथित झालेल्या पंकजा मुंडेंनी आपल्या सोशल मिडियावरील फेसबुक, वाट्स अपसारख्या माध्यमातून पक्षाचं चिन्ह बाजूला केलं. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष सोडणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यांनी देखील सस्पेन्स कायम ठेवत आपण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावरच आपली भूमिका स्पष्ट करू, कार्यकर्त्यांनी व्यथित होऊ नये, असे आवाहन केले. याची दखल पक्षाला घ्यावी लागली.
गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजर झाले. त्यांच्यासमोर बोलताना पक्ष माझ्या बापाचा आहे, मी पक्ष सोडणार नाही, अशी घोषणा करतानाच माझा संघर्ष कायम राहील, सामाजिक कार्यही सुरूच ठेवणार, अशी घोषणा केली, त्यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांची बरीच समजूत काढण्याचा प्रयत्नही केला.
दरम्यान, त्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि सत्तेच्या चाव्या भाजपाऐवजी सोबत आलेल्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून हिसकावून घेतली. त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेत भाजपला जावे लागले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद गाजविलेले पंकजा मुंडे यांचे कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपसूकच आले. पंकजा मुंडेंनी बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर त्याची पक्षाने दखल घेतली असून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी घोषणा दस्तूरखुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. परंतु ती देखील फोल ठरली आणि बीड जिल्ह्याच्या या रणरागिणीचा स्वकियांकडून विरोध झाला, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
कोरोनाचं संकट असताना देखील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे
विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या आणि भाजपाने अडगळीत टाकलेले माजीमंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना मागच्या दाराने आमदार होण्याच्या आशा दिसू लागल्या. परंतु केंद्रीय समितीकडे बोट दाखवत या तीनही नेत्यांना डावलल्याने संताप सुरू झाला. पंकजा मुंडे या बाबांप्रमाणेच मास लिडर असल्याने त्यांच्यामुळेच भाजपाशी जोडलेला वर्ग नाराज झाला. स्वकियांनी घात केल्याने यावेळी पंकजांची नाराजी उघड झाली नाही. त्यांनीच कार्यकर्त्यांना दिलासा देत सावरले. परंतु या रणरागिनीच्या राजकीय वाटेत काटे पेरणारे मात्र मनोमन खुश झाले.
आता आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणे, एवढाच पर्याय समोर आहे. सोपा मार्ग बंद करून पुन्हा त्यांच्यासमोर खडतर वाटचाल आहे. ही निवडणूक राजकीय खेळी करून त्या जिंकतीलही आणि कदाचित विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही नंतर त्यांच्या पारड्यात टाकले जाईल. परंतु हा छळवाद न करता देखील विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना पद देता आले असते..!