# पुण्यासह पिंपरीतील उद्योग धंद्याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय झाल्यावर प्रशासन आदेश काढणार.

पुणे:  जिल्ह्यातील उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला.

यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजीव देशमुख, उद्योग विभागाचे सहसंचालक श्री. सुरवसे उपस्थित होते. यावेळी ४०० हून अधिक असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्राला येणाऱ्या अडचणींबाबत ‍ माहिती देवून विविध सूचना केल्या.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, उद्योग धंद्याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय झाल्यावर प्रशासन आदेश जारी करेल. पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील काही कन्टेन्मेंट क्षेत्रातून कामगारांची व आवश्यक मालाची ने- आण करता येणार नाही.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही भाग प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या भागात सध्या उद्योग सुरु करता येणार नाहीत. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत हालचाल करता येणार नाही. परंतु 17 तारखेनंतर येथे उद्योग सुरू करण्याबाबत राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर याबाबत विचार केला जाईल.

कामगारांचे स्थलांतर होत असून अशा परिस्थितीत उद्योग सुरु राहण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देवून या मनुष्यबळाचा वापर करुन घेण्याबाबत उद्योजकांनी विचार करावा, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले. उद्योगासाठी कामगारांची पर जिल्ह्यातून ने-आण करता येणार नाही. याबाबत शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.

उद्योग समूहाने कोरोना कालावधीत सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, हातांची स्वच्छता राखणे आदी खबरदारी घेवून उद्योग क्षेत्रातील कामे सुरु ठेवावीत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *