पुणे: बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागाबरोबरच अंदमान आणि निकोबार बेटांबर सध्या असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. त्यानंतर लागलीच या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे. परिणामी 17 ते 19 मे या कालावधीत केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, लक्षव्दीप, तेलंगणा, ओडिशा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी या भागात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, या स्थितीमुळेच मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे 16 मे रोजी मान्सून या भागात दाखल होईल.
बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण तयार होत आहे. 15 मेच्या संध्याकाळपर्यंत या भागात चक्रीवादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. याबरोबरच तासी 45 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे 18 मे च्य आसपास ओडिशा ते पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर असलेल्या मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश करू नये तसेच मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्यांनी किनारपट्टीकडे परतावे, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. सध्याच्या वातावरणामुळे मान्सून मात्र वेळेत (16मे) दाखल होण्यासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झाले आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.