प्रतिकात्मक छायाचित्र
औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुरूवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत शहरात सलग तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे तीन दिवस औरंगाबादेतील कोणतीही आस्थापना, दुकाने उघडणार नाहीत. फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचारीच कर्तव्यावर हजर रहातील, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त आस्तिककुमार पांडेय ट्वीटरवर दिली आहे.
औरंगाबादेत आगोदरच ऑड-इव्हन म्हणजेच सम-विषम पद्धती लागू करण्यात आली आहे. शंभर टक्के लॉकडाऊनच्या या तीन दिवसांत शुक्रवार आणि रविवार हे विषम दिवस आहेत. शनिवार हा सम दिवस असला तरी शंभर टक्के लॉकडाऊनच्या निर्णयामुळे या दिवशी कोणतीही दुकाने, आस्थापना उघडता येणार नाहीत. फक्त अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही कर्तव्यावर हजर राहतील, असेही या आदेशात म्हटले असल्याचे ट्वीट पांडेय यांनी केले आहे.