# चालता बोलता रोबोट करणार कोरोना रूग्णांची तपासणी; पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाचे यश.

 

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाला आळा घालण्यासाठी नुकताच रूग्णांना सेवा देणार्या रोबोटची ओळख पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने करून दिली होती. त्यातच आता प्रशासनाने पुढचे पाऊल टाकत कोरोना रूग्णाची तपासणी करून त्यांची लक्षणे जाणून घेणारा चालता बोलता रोबोट विकसित केला आहे.

सध्या जगभर कोरोना या महामारीने हाहाकार केला आहे. या महामारीने भारतामध्ये देखील थैमान घातले आहे. पुणे शहर आणि परिसरात दररोज या महामारीचे रूग्ण वाढत आहेत. या रूग्णांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाने रिमोट कंट्रोलवर आधारित रोबोट तयार केला होता. सध्या हा रोबोट  बोर्डाच्या पटेल रूग्णालयातील कोरोना रूग्णाच्या सेवेत कार्यरत आहे. मात्र, आता आयटीआय विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकत एका विशेष रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट चालता बोलता असून, कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांचे स्क्रीनिंग करणार आहे. त्याचबरोबर शरीरामधील तापमानाची नोंद सुध्दा घेणार आहे. हा चालता बोलता रोबोट रूग्णांचे स्क्रींनिग करून रूग्णांना विविध प्रश्न देखील विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोटमध्ये विकसित करण्यात आली आहे.

रोबोटने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिल्यानंतर संबंधित रूग्णास कोरोना वॉर्डमध्ये दाखल करावयाचे की, विलगीकरण कक्षात ठेवायचे याचा निर्णय रूग्णालयातील डॉक्टर घेणार आहेत. या रोबोटमुळे पटेल रूग्णालयामधील डॉक्टर, परिचारिका यांचे काम सोपे होणार आहे. पहिल्या टप्प्यात हा रोबोट रूग्णालयातील कॅज्युअल्टीमध्ये बसविण्यात येणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात माहिती देताना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार म्हणाले की, बोर्डाच्या आयटीआय विभागाने अत्यंत कुशलतेने अत्याधुनिक चालता बोलता रोबोट तयार केला आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा रोबोट अतिशय कमी खर्चात तयार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *