प्रतिकात्मक छायाचित्र
बीड: गेवराई तालुक्यातील इटकूर येथील १२ वर्षीय मुलगी आणि माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील २९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह येताच बीड जिल्हा प्रशासनाने प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही गावापासून सात किलोमीटरच्या परिसरात येणारी बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील एकूण ३० गावे बफर आणि कटेन्मेंट झोन घोषित करण्यात आली आहेत.
गेवराई व बीड तालुक्यातील इटकूर या गावापासून ३ कि.मी. परिसरातील गेवराई तालुक्यातील इटकूर, हिरापूर, शिंपेगांव, कुंभारवाडी व बीड तालुक्यातील खामगांव, नांदुर हवेली व पारगांव जप्ती हा परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या झोननंतर पुढील ४ कि.मी. परिसरातील गेवराई तालुक्यातील लोळदगांव, अंकोटा, शहाजानपूर चकला, मादळमोही, कृष्णनगर, पाडळसिंगी, टाकळगांव व बीड तालुक्यातील आहेरचिंचोली, कामखेडा, पेंडगांव, हिंगणी हवेली, तांदळवाडी हवेली व पारगांव शिरस या गावांना बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ही सर्व गावे आणि परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, माजलगांव तालुक्यातील हिवरा बु. या गावापासून ३ कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील हिवरा बु., गव्हाणथडी, काळेगांवथडी, डुब्बाथडी व भगवाननगर हा परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील चार कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील राजेगांव, सुर्डी, महातपुरी, वाघोरा व वाघोरा तांडा ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ही सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारवंदी लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.