आजपावेतो इटल, स्पेन, जर्मनी, फ्रान्स व अमेरिका मिळून सुमारे 65 हजार बळी….भारतातही सार्वजनिक आदेश न पाळल्यास प्रचंड प्रसार होण्याची शक्यता व या देशांइतकाच धोका…! कुठून आले हे संकट ? तर ते आले चीनमधून!!! खवल्या मांजराचे तुकडे वटवाघळांच्या सुपाच्या घोटाबरोबर घेणारे हे चायनीज, हे जरी खरे असले तरी कोरोना नावाचा विषाणू वुहान येथून आलाय, असेही बोलले जात आहे. हाच विषाणू आज अख्या जगाच्या नरडीचा घोट घेऊ पाहात आहेत….’आणि बुद्ध हसला’ असा धडा आम्हाला होता, यदुनाथ थत्तेंचा…आता तो क्रूर थट्टेचा विषय बनला आहे …..ज्या देशात बुद्ध धर्म गेला त्या देशातील मुख्यत्वे पोट भरण्यासाठी झालेला हिंसाचार पाहून बुद्ध रडणारच नाही तर अक्षरशः डोळ्यांच्या खाचा करून घेऊन रक्ताश्रुंना वाट करून देईल..!आणि एवढा उच्छाद मांडून हा देश आज स्पेन, इटलीला मास्क आणि वैद्यकीय उपकरणे विकून शब्दशः व्यवहारी नक्राश्रु ढाळत आहे…! या देशाच्या अजस्त्र पोलादी पडद्यामागून अपघाताने विषाणू जन्माला आला काय किंवा त्यांनी जगाला पंगू करण्यासाठी जन्माला घातला काय, या तपशीलात जायचे कशाला? माणूस म्हणून पृथ्वीवर वावरणारे प्राणी जेव्हा दुसऱ्या प्राण्यांची प्रजात नष्ट होईपर्यंत कत्तल करतात, त्यातून उत्पन्न झालेल्या संसर्गजन्य व्याधीतून अवघ्या जगाला दंश करून व्हेंटिलेटरखाली चरफडत ठेवतात व आपला दूरदर्शी व्यापार प्रशस्तपणे स्थापतात तेव्हा या द्विपाद प्राण्याला जन्माला घातले तरी कशाला असा प्रश्न सृष्टीला पडत असेल…! पशूंचे हे नृशंस हत्याकांड करून त्यांच्या रक्तामांसाचे सेवन करण्यासाठी अवलंबन करण्यात येणाऱ्या पद्धती, पुढे त्याचा व्यापार, अर्थकारण ह्याद्वारे एका विषाणूमुळे संसर्गाचे प्राणघातक संकट आज आपल्या कंठाशी आणून ठेवले तेव्हा ‘खाल्ले ते पसरले’ याचा आपल्याला परिचय झाला! अन्यथा हे सारे तिथे ड्रॅगनच्या पंज्याखाली कित्येक दशके हे राजरोज चालूच होते आणि पुढेही ते थांबण्याची कुठलीही शक्यता नाही!!! एरव्हीदेखील हा देश दरडोई उत्पन्नांच्या रकान्यात व व्यापारांच्या जगतात पहिल्या पाचातले स्थान बाळगून असेलही पण हा समृद्ध देश म्हणून कधीच नव्हता…. मुळात समृद्धतेच्या धारणा व निकषच हे ‘मार्केट’ नावाचा भुलभुलैया तयार करत असेल तर अशा देशाने पहिल्या पाचात पहिले स्थान मिळवले तरी त्या देशाने शरमेने मान खाली घालायला हवी….!कारण समृद्ध म्हणावा तर दुसऱ्या देशाच्या सीमा, सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय संकेत व नियम धाब्यावर बसवून हा देश हातपाय कसा पसरतो? तोच देश समृद्ध जो आपल्या सीमेच्या आत राहतो व त्याच्या सीमा दुसऱ्या देशावर लादत नाही…! याउलट कितीही मोठा असला व आपल्या पाताळयंत्री धोरणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असला तरी असा देश जर दुसऱ्या देशांचे काही शेकडो किलोमीटर्सचे लचके तोडत असेल तर तो देश भिकारी देशच म्हटला पाहिजे…! आणि आता तर हा भिकारी देश अनेक प्राण्यांचे कातडे पांघरून त्यांच्या संसर्गाचा विषाणू भरलेला कटोरा हातात घेऊन आपल्या आबालवृद्धांच्या प्राणांचीच भीक मागत आपल्या उंबऱ्यावर उभा आहे.. ! हे ओळखून आपण आपल्या भूमीत जन्मलेल्या आदर्शांचे जितके स्मरण ठायी ठायी करत जगू , जेवढे शिस्तप्रिय होऊ, एकनिष्ठ राहू व त्याद्वारे एकमेवाद्वितीय परंपरा लाभलेल्या, सगळ्या विश्वाला कल्याणाच्या मार्गाची दिशा दाखवण्याची पात्रता असणाऱ्या भारतभूला स्वावलंबी बनवू तेव्हाच आपल्याला अशा भिकाऱ्यांना भीक न घालण्याची पात्रता आपल्या देशाच्या अंगी येईल…!
– सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
लेखक उद्योजक आहेत
मो 9767202265
surendrakul@rediffmail.com