पुणे: बंगालच्या उपसागरातील मध्यवर्ती भागात तयार झालेल्या अमफन चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता खेचून घेतली आहे. परिणामी अंदमानपर्यंत दाखल झालेल्या मान्सूनचा वेग मंदावला आहे. 21 मे पर्यंत हे चक्रीवादळ राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतरच मान्सूनचा पुढील प्रवास सुरू होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरासह अंदमान निकोबार बेटांवर रविवारी नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) दाखल झाला. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांंपासून बंगालच्या उपसागरातील मध्यवर्ती भागात अमफन चक्रीवादळ तयार होऊ लागले होते. सध्या हे चक्रीवादळ मध्यवर्ती भागापासून उत्तरेकडे सरकू लागले आहे. या चक्रीवादळाचा वेग आता वाढला आहे. 18 ते 20 मे च्या आसपासच्या या चक्रीवादळाचा वेग ताशी 155 ते 185 कि.मी. राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ ओडिशातील पारादीपपासून 780 तर पश्चिम बंगालच्या (दिघा) दक्षिणपूर्व भागापासून 930 आणि बांग्लादेशमधील खेपुपारापासून 1050 कि.मी. अंतरावर समुद्रात आहे. या चक्रीवादळाचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळामध्ये झाले आहे. त्यामुळे 21मे पर्यंत पूर्व किनारपट्टीसह केरळ, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटांवर अती मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. सध्या या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. 21 मे नंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची आगेकूच सुरू होईल.