नांदेड: कोरोना या विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयाचे सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज येत्या ३१ मे पर्यंत बंद राहणार आहे. विद्यापीठ परिसर आणि उपपरिसर येथील संचालक आणि प्रशासकीय विभागप्रमुख यांच्यासह वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी यांनी कामकाजाच्या निकडीनुसार कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच आपल्या अधिनस्त वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रोटेशन पद्धतीने कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल, असे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या निर्देशनुसार कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोरोना विषाणूच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रकान्वये कळविल्याप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचे देशभरातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, सर्व संलग्नित महाविद्यालय, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज ३१ मे पर्यंत बंद राहणार आहे. येथील प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज पूर्ण करावे.
विद्यापीठ परिसर आणि उपपरिसर येथील संचालक आणि प्रशासकीय विभागप्रमुख यांच्यासह वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी यांनी कामकाजाच्या निकडीनुसार कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच आपल्या अधिनस्त वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रोटेशन पद्धतीने कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल, याची नोंद घ्यावी. विद्यापीठ तसेच महाविद्यालयास कार्यालयीन कामकाजासाठी एखाद्या प्राध्यापक, अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची गरज भासल्यास विभागप्रमुख किंवा प्राचार्य यांच्या आदेशानुसार संबंधित प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहील, याची नोंद घ्यावी आणि दि.३१ मे, २०२० पर्यंत मुख्यालय सोडू नये, असेही कळविण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या वतीने यापूर्वी दिलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ बाबतच्या परिपत्रकाचे जशास तसे आदेश लागू राहणार आहेत. पुढील सूचनांसाठी, अधिक माहितीकरिता विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच आपला ई-मेल आय.डी. पहावा. प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेची विद्यापीठास आवश्यकता असेल त्यावेळी आवश्यकतेनुसार संबंधितास विद्यापीठ कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहील, असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.