पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत संस्थेमार्फत 29 मार्चपासून म्हणजेच लॉकडाऊन- एकच्या सुरुवातीपासून पुण्यात अडकलेल्या बेघर, गरजू व गरिबांना मोफत भोजन व पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने व केंद्र शासनाच्या वतीने जसजसा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला तसतसा या योजनेचे प्रणेते बार्टीचे महासंचालक कैलास कणसे (भा.पो.से.) यांनी या मोफत भोजन वाटपाचा कालावधी वाढवित नेला आणि योजना अंमलबजावणीच्या नियोजनाबाबत सूचना बार्टीचे निबंधक यादव गायकवाड यांना दिल्या. दरम्यान, निबंधक यादव गायकवाड यांचेकडून या कामासाठी स्वेच्छेने पुढे आलेल्या बार्टीच्या अधिकारी व कर्मचारी यांची एक टीम तयार करण्यात आली. यात नितीन सहारे प्रकल्प संचालक, मूल्यमापन कक्ष, भीमराव पारखे, प्रकल्प संचालक, येरवडा संकुल व्यवस्थापन, आरती डोळस, प्रकल्प संचालक, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग, डॉ. मुकेश दुपारे, प्रकल्प संचालक, संशोधन व प्रशिक्षण विभाग, प्रशांत बुद्धिवंत प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग, प्रज्ञा वाघमारे, मुख्य प्रकल्प संचालक, समतादूत विभाग, सुभाष परदेशी, सहायक प्रकल्प संचालक, आस्थापना विभाग, संजीव कटके, सहायक प्रकल्प संचालक, समता प्रतिष्ठान, कुणाल शिरसाठे, प्रकल्प व्यवस्थापक, कौशल्य विकास विभाग या अधिकाऱ्यांचा आणि बाळासाहेब ढमाले, सुरक्षारक्षक सुपरवायझर, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरक्षारक्षक, सखाराम कदम, सुरक्षारक्षक, प्रदीप भालेराव, वाहनचालक यांनी सहभाग नोंदवून मोलाचे योगदान दिले. बार्टीच्या या भोजन वाटप टीमकडे दैनंदिन भोजन वाटपाची जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने वेळापत्रकानुसार आखणी करुन सोपविण्यात आली.
बार्टीच्या या टीममार्फत दैनंदिन भोजन वाटप शहराच्या विविध भागातील गरजूंना करण्यात आले. यामध्ये पन्नास दिवसात दररोज 600 ते 700 फूड पाकिटांचे वितरण करण्यात आले. यात बीड येथील पुण्यात अडकलेले ऊसतोड कामगार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विविध कामगार दिव्यांग, भिक्षेकरी, मनोरुग्ण वृद्ध, महिला, बालके तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणारे विविध कर्मचारी इत्यादींचा समावेश होता.