# सलग तीन दिवसांपासून दोन हजारांच्या पटीत कोरोनाबाधितांची वाढ; आज २१२७ नवीन नोंद, राज्यात एकूण ३७१३६ रुग्ण, ७६ जणांचा मृत्यू.

 

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. आज २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पटीत वाढत आहे. सोमवारी २०३३ व रविवारी २३४७ नवीन रुग्णांची वाढ झाली होती.

दरम्यान, राज्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३२५ झाली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४३, ठाणे शहरात १५, पुण्यात ६, अकोल्यात ३, नवी मुंबईमध्ये २, बुलढाणा २, नागपूर शहरात २, औरंगाबाद शहरात १, धुळे शहरात १ तर नाशिक शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर ३९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये (७६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १३२५ झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ३० एप्रिल ते १६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४४ मृत्यूंपैकी २२ मुंबईचे, १५ ठाण्याचे, अकोला मनपाचे २ तर, बुलढाणा १, धुळे १, नागपूर १ नाशिक १ आणि पुण्यातील १ आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १७६५ कटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५ हजार १७८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.२९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक १२०२ रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- ६२२, ठाणे- १९४, पालघर- २७, रायगड- १०, नाशिक- ८८, अहमदनगर- ८, जळगाव-२८, पुणे-१३१, सोलापूर-११, सातारा-२, सांगली- १, औरंगाबाद- ३१, जालना-१, अकोला-४, अमरावती-३, यवतमाळ- १, नागपूर- ४० रुग्ण सोडण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *