# प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी; कोरोना रुग्णांवर उपचार करताना अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये.

 

पुणे: पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जमाबंदी आयुक्त व संचालक तथा ससून रुग्णालयासाठी नियुक्त प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नियुक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भुजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर व श्री. चोक्कलिंगम यांनी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये असणारी शासकीय व खाजगी रुग्णालये, यामधील उपलब्ध खाटांची संख्या, अतिदक्षता विभागात उपलब्ध खाटा व अन्य बाबींचा आढावा घेतला.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. कोरोना रुग्णांवर उपचार करताना अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, या दृष्टीने काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची यादी करुन त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, स्वछतेबाबत जनजागृती करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या विचारात घेऊन पुढील काळात गरज भासल्यास आवश्यक बेड, व्हेंटिलेटर व त्या अनुषंगिक वैद्यकीय साधनसामग्रीची व्यवस्था करुन घ्यावी. खासगी रुग्णालयांनी गोर-गरीब रुग्णांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रयोगशाळांनी स्वॅब तपासणीची क्षमता वाढवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देवून आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीत आयुक्त शेखर गायकवाड व श्रावण हर्डीकर यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील नागरिक, झोपडपट्टीमध्ये राहणारे एकूण नागरिक, शहरातील कटेन्मेंट क्षेत्र तसेच येथील दक्षता घेणे आवश्यक असणारे ज्येष्ठ व आजाराची पार्श्वभूमी असणारे नागरिक यांची माहिती दिली.

डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहरात कोरोना अटकावासाठी पोलीस विभाग करत असलेल्या कामाची माहिती दिली. सौरभ राव यांनी कटेन्मेंट क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने कोणकोणते बदल करणे आवश्यक आहे, याबाबत सूचना केल्या. यावेळी अनिल कवडे, सचिंद्र प्रताप सिंग, डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देऊन सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *