संग्रहित छायाचित्र
पुणे: महावितरणच्या वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या वीजग्राहकांना त्यांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापरानुसार अचूक वीजबिल देण्यात येत आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच चालू रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना एप्रिल महिन्याच्या बिलातील सरासरी युनिट व रक्कम भरली असल्यास त्याचेही समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे.
महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील एकूण 69912 वीजग्राहकांनी एप्रिलमध्ये दिलेल्या मुदतीत स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविले होते. या सर्वांना एप्रिल महिन्याचे प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र, ज्या वीजग्राहकांनी एप्रिलमध्ये रिंडीग न पाठवता मे महिन्यात चालू मीटर रिडींग पाठविले त्यांना एप्रिल व मे महिन्यांचे प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीजबिल देण्यात येत आहे. या बिलामध्ये महावितरणकडून पाठविण्यात आलेले एप्रिल महिन्याचे सरासरी युनिट वगळण्यात येत आहे. ग्राहकांनी एप्रिलचे सरासरी वीजबिल भरले असल्यास त्यातील फिक्स चार्जेसची रक्कम वगळता उर्वरित रक्कम सुद्धा मे महिन्याच्या बिलात समायोजित करण्यात येत आहे. तसेच स्लॅब बेनिफिट देखील देण्यात येत आहे. याबाबतची सर्व माहिती संबंधित ग्राहकांना वीजबिलावर उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणने गेल्या 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याचे प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. रिडींग उपलब्ध नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे.
ज्या वीजग्राहकांनी मीटर रिडींग पाठविलेले नाही त्यांना सरासरी वीजवापरानुसार बिल देण्यात येत आहे. महावितरणकडून ग्राहकंकडे जाऊन मीटर रिडींग घेणे सुरु झाल्यानंतर या सर्व ग्राहकांना वीजवापरानुसार अचूक वीजबिल देण्यात येणार आहे.