# मुंबईतील ४० जणांसह राज्यात आज ६० जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधित ४७ हजार १९०.

 

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. दरम्यान, मुंबईतील ४० जणांसह राज्यात आज ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ४७ हजार १९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५७७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साता-यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *