नांदेड: उमरी तालुक्यातील नागठाणा खुर्द येथील महादेव मंदिराचे मठाधीश 108 प.पू. बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज (वय33) यांची व मठात राहणार्या भगवान बाबाराव शिंदे (वय50) यांचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्हा हदरून गेला आहे. बालयोगी महाराजांच्या हत्येने गावकर्यांमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपीस अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी हत्या करणारा संंशयित आरोपी साईनाथ आनंदराव लिंगाडे (वय25) यास तेलंगणा राज्यातील निर्मळ जिल्ह्यातील तानूर येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प.पू. बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज हे 2008 पासून महादेव मंदिरात राहत होते. मेळचे कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथील रहिवासी आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी ते गावात आले. मठात राहून आधात्मिक व धार्मिक कार्य करत असत. महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक-भक्त येत असत. दरवर्षी तेथे दीपोत्सव भरत असतो. यासाठी तीस ते चाळीस हजार भाविक येतात. उमरी तालुक्यातील तळेगाव येथे त्यांनी गोशाळा उभारण्याचे कार्य हाती घेतले, हे कामही प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, गावातील साईनाथ लिंगाडे हा संशयित घटना घडली तेव्हा मठाजवळ होता. गावकर्यांनी, महाराज कुठे आहेत, अशी विचारणा त्याचाकडे केली असता त्याने तेथून पळ काढल्याची माहिती गावकर्यांनी दिली.
या घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात उमटले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या घटनेचा निषेध केला असून, पोलिस अधीक्षकांना आरोपीस तत्काळ पकडण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
संशयित आरोपीस अटक: दरम्यान, बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज यांच्यासह एकाची हत्या करणारा आरोपी साईनाथ आनंदराव लिंगाडे (वय25) यास तेलंगणा राज्यातील निर्मळ जिल्ह्यातील तानूर येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपीस धर्माबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती उमरी पोलिसांनी दिली.