मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६, सोलापूरात ६, औरंगाबाद शहरात ४, लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.