पुणे: राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. विशेष म्हणजे सूर्यास्तानंतरही उष्णतेची धग कमी झाली नव्हती. सोमवारी राज्यात अकोला शहराचे तापमान सर्वाधिक 47.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. त्याखालोखाल मराठवाड्यात परभणी 46 अंश तर नांदेडचे तापमान 45.5 एवढे नोंदले गेले. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्लीसह आसपाच्या परिसरात मागील तीन दिवसांपासून कोरड्या हवामानामुळे उष्णतेची लाट आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे उष्णवारे वाहत आहेत. त्यामुळेच राज्यातील कमाल तापमनात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. मध्यमहाराष्ट्रापेक्षा, विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा जास्त आहे.
राज्यात सोमवारी सायंकाळपर्यंत नोंदलेले कमाल तापमानः अंश सेल्सियसमध्ये- पुणे -40.2, लोहगाव-41, जळगाव-45.3, कोल्हापूर-37.4, महाबळेश्वर-32.2, नाशिक- 39.2, सांगली- 39.7, सातारा 40.4, सोलापूर-45, मुंबई -34.2, अलिबाग-33.1, रत्नागिरी- 34.6, डहाणू- 35.5, औरंगाबाद- 43.1, परभणी-46, नांदेड- 45.5, अकोला-47.4, अमरावती- 46, बुलढाणा- 42.6, ब्रम्हपुरी-45.2, गोंदिया – 45.8, नागपूर-47, वर्धा -45.