# बीड जिल्ह्यात आता आस्थापना, दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दररोज चालू.

 

बीड: जिल्ह्यातील व्यवसायांच्या व उद्योगांच्या कामकाजाविषयीचे याआधीचे लॉकडाऊन काळातील सर्व आदेश अधिक्रमित करण्यात आले आहेत. प्रतिबंधित बाबी व्यतिरिक्त इतर बाबींना सुरु करण्यास परवानगी असेल असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

पुढील काही बाबी जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत खालील सूचनांप्रमाणे प्रतिबंधित असतील. याव्यतिरिक्त इतर बाबींना सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

A) शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, शिकवणी केंद्रे इ. बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण/ दुरस्थ शिक्षण चालू राहील आणि त्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

B) सरकारी कर्मचारी/ पोलीस/आरोग्य कर्मचारी/ अडकलेल्या व्यक्ती/ प्रवासी/अलगीकरण कक्ष/ विलगीकरण कक्ष/ बस्थानक व रेल्वे स्थानक यांचेसाठी असलेली हॉटेल / उपाहारगृहे वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर सेवा देणारे
आस्थापना बंद राहतील. रेस्टॉरंटला पार्सल सेवा देण्यासाठी सूट देण्यात येत आहे. सर्व हॉटेल, ढाबे,चाटसेंटर्स, खानावळी इ.ना केवळ घरपोच सेवेसाठी/ पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात येत आहे.

C) सर्व सिनेमागृहे, मॉल, व्यायाम शाळा, जलतरणिका, मनोरंजन उद्याने, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील.

D) सर्व सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्य व इतर संमेलने व जमावास बंदी
राहील.

E) सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक परिषद/ संमेलने /जमाव यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

F) क्रीडासंकुले, क्रीडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तीक व्यायामासाठी खुल्या राहतील, परंतौ प्रेक्षक व सामूहिक क्रीडा/व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही.
सर्व शारिरिक कसरती, व्यायाम व तत्सम कृतींना कोव्हीड -१९ विषयक सर्व नियमावली आणि सामाजिक अंतराविषयक नियमांचे पालन करण्याचे अटीवर परवानगी देण्यात येत आहे.

G) सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींना खालील प्रमाणे प्रवासी वाहतुकीचे नियम पाळून वाहने वापरता येतील.
अ) दुचाकी :-१चालक
ब) तीन चाकी :- चालक + दोन प्रवासी
क) चार चाकी :- चालक + दोन प्रवासी

जिल्ह्यांतर्गत बससेवेला केवळ ५० टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी देण्यात येत आहे. सदरील बसमध्ये सामाजिक अंतर आणि कोविड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील. जिल्हा बाहेरील बस सेवेसंदर्भात शासनाचे आदेश आल्यावर वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.

H) बार व दारु दुकानांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

I) पानटपरी, तंबाखू, गुटखा, पानमसाला, खर्रा व तत्सम सर्व बाबींच्या विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी सेवनास बंदी कायम राहील.

J) सर्व केशकर्तनालये, ब्यूटी पार्लर व तत्सम दुकानांना सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असून सर्व ठिकाणी सामाजिक अंतर कोविड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील.

याचबरोबर या आदेशानुसार पुढील नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

1) कटेन्मेंट झोन (Containment zone) व बफर झोनमध्ये (Buffer Zone) घोषित केलेल्या ठिकाणी त्याबाबत आदेशाप्रमाणे व्यवसायांना परवानगी राहील.

२) संध्याकाळी ०७.०० वा. ते सकाळी ०७.०० वा. काळामध्ये जीवनावश्यक सेवांशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती पास असूनही घराबाहेर राहू शकणार नाही.

3) तसेच ६५ वर्षापेक्षा जास्त वयांच्या व्यक्ती ज्यांना जूने आजार आहेत. (रक्तदाब, मधूमेह, इतर तत्सम द गंभीर विकार मोठया शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती इ.) गर्भवती महिला, १० वर्षाखालील वयांची मुले व मुली यांना जीवनावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर कधीही पडता येणार नाही.

4) कोणत्याही दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत आणि त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान ६ फूट अंतर असावे. ही दुकानदारांची वैयक्तीक जबाबदारी असेल.

5) सर्व आस्थापना/दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वा. पर्यंतच्या कालावधीत दररोज चालू राहतील. बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे काम करावे. सदरील ठिकाणी गर्दी झाल्यास अथवा सामाजिक अंतर राखले न गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरित असे दुकाने/मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करतील आणि उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. सबब याविषयी सर्व दुकानदार व नागरिकांनी काळजी घेणे बंधनकारक आहे.

सर्वच नागरिकांनी आता अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे परवानगी दिलेल्या वेळेत परवानगी दिलेली कामे करण्यासाठी पासची आवश्यकता राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *