नांदेड: जिल्ह्याच्या विकासासाठी समाजात जाऊन अहोरात्र काम करीत असताना दुर्देवाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवार, 24 मे रोजी प्राप्त झाला असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे काल रविवारी सकाळी 10 वाजता त्यांचा कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला. या स्वॅबचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता पॉझिटिव्ह प्राप्त झाला. तत्पूर्वी सकाळी 11 वाजताच काबरानगर परिसरातील आशा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची वार्ता राज्यभर पसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी मुंबईस येण्याचा आग्रह धरला. त्यानुसार आज सोमवारी सकाळी 11 वाजता अम्ब्युलन्सद्वारे औरंगाबाद-पुणे मार्गे ते मुंबईकडे रवाना झाले. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, माजी नगरसेवक सुभाष रायबोले, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांची उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत निष्णात डॉक्टरांची टीम आहे. मुंबई येथील ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
राहुल गांधी यांच्याकडून प्रकृतीची चौकशी: दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळताच काँग्रेस नेते खा. राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद, अहेमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
जेवढे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या शहरात वा गावात चांगले हॉस्पिटल नाही? किंवा तज्ञ डोकटर्स नाहीत?
मुंबईला गेले तर खाजगी रुग्णालयात. सरकारी रुग्णालयावर भरोसा नाही?
अजब आहे.