# मान्सून 27 मे पर्यंत अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरात दाखल होणार; केरळमध्ये 5 ऐवजी दोन जूनला येणार.

 

पुणे: अमफन चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील काही भागासह अंदमान आणि निकोबार बेटांवर थांबलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आता पुन्हा एकदा जोमाने पुढील वाटचाल करणार आहे.  त्यासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार 27 मे पर्यंत मान्सून बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, मध्यवर्ती भागासह अंदमान समुद्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, अनुकूल स्थितीमुळे केरळमध्ये 5 ऐवजी दोन जून रोजीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

मान्सून बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर 16 मे रोजी दाखल झाला होता. सरासरीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच मान्सून  या भागात दाखल झाल्यामुळे केरळपर्यंत मान्सून 30 मे पर्यंत पोहचेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अमफन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल, बांग्लादेश, ते अगदी ओडिशापर्यंत जोरदार धडक मारली. या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता शोषून घेतली. परिणामी मान्सूनचा प्रवास मंदावला आणि अंदमान, निकोबार बेटांवरच थांबला. दरम्यान, चक्रीवादळ आता शमले असून पुन्हा एकदा मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून 27 मे पर्यंत मध्य आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्र आणि आसपासच्या भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *