पुणे : कोरोनाशी लढण्यासाठी देशभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीही सज्ज झाल्या आहेत. मास्क, सॅनिटायझरसह संरक्षक पोषाख (सूट), व्हेंटिलेटर्सचीही निर्मिती या फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यातील खडकी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत पाच हजार लिटर सॅनिटायझर, एक लाख मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतरही गरजेनुसार ही निर्मिती सुरूच राहणार आहे. दरम्यान, खडकीतील ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या हॉस्पिटलमध्ये पंचवीस खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्षही तयार करण्यात आला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी देशभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या सर्व कर्मचार्यांनी एक दिवसाचा पगार पंतप्रधान रिलिफ फंडाला दिला आहे. कोरोनामुळे देशभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या वैद्यकीय गरजांची पूर्तता करण्यास खासगी कंपन्याही अपुर्या पडत आहेत. त्यामुळे देशाची गरज भागविण्यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीना मास्क, सॅनिटायझर, संरक्षक पोषाख तयार करण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यानुसार हे उत्पादन सुरू झाले आहे.
विलगीकरण कक्षही तयार
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास देशभर अधिकाधिक विलगीकरण कक्षांची गरज भासणार आहे. ती लक्षात घेऊन, देशभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या हॉस्पिटलमध्ये विलगीकरणाच्या (आयसोलेशन) एकूण २८५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्रात खडकी, अंबाझरी व अंबरनाथ येथे प्रत्येकी २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व कक्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकांनुसारच तयार करण्यात आले आहेत.